हिंदुस्थानचा अश्वमेधाचा घोडा भरधाव निघालाय

534

>> द्वारकानाथ संझगिरी

चक्रवर्ती राजाने अश्वमेध यज्ञासाठी अश्वमेधाचा घोडा सोडण्याची पद्धत रामायण-महाभारतानंतर का थांबली? नाहीतर आज विराट कोहलीने सोडलेला पांढराशुभ्र घोडा जगभर फिरला असता. त्याला अडवण्याची हिंमत फारजणांत दिसली नसती.
एकेकाळी जगात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज या क्रिकेटमधल्या सुपर पॉवर्स होत्या. आता आधी हिंदुस्थान येतो. मग ऑस्ट्रेलिया-इंग्लंड. ही गेल्या काही वर्षांची कहाणी आहे.

या कहाणीतला अगदी नवाकोरा प्रसंग म्हणजे न्यूझीलंडला न्यूझीलंडमध्ये टी-ट्वेंटीत 5-0 ने हरवणं.चॅम्पियन संघ कसा असतो याची व्याख्या हिंदुस्थानी संघाने थोडी वरच्या स्तरावर नेऊन ठेवली. लागोपाठच्या सामन्यांतील दोन सुपर ओव्हर्समधले विजय ही पराभवाच्या कराल वगैरे म्हणतात तशा दाढेतून विजय काढण्याचं मूर्तिमंत उदाहरण होतं आणि ते करणारे दंतवैद्य कोण होते, तर प्रत्येकवेळी वेगळा. एकदा शमी-रोहित, एकदा चक्क शार्दुल ठाकूर. पहिल्या सुपरओव्हरच्या सामन्यातल्या शमीची कामगिरी कदाचित रोहितच्या दोन षटकारांपेक्षा एक अंगुळ वरची होती. षटकाराएवढे उत्तम यॉर्कर किंवा तत्सम कुठल्याही चेंडूला वलय नाही म्हणून तो पराक्रम रोहितच्या पराक्रमाएवढा गाजला नाही. रोहितच्या खेळीला काव्याचं भाग्य लाभलं. शमीच्या षटकाला जेमतेम चारोळीच. शमीच्या घराच्या भिंतीवर त्याचं पदवी सर्टिफिकेट लटकलंय की नाही त्याची मला कल्पना नाही. पण शेवटच्या षटकाच्या स्कोअरशिटची फ्रेम त्याने भिंतीवर लावावी. जिंकायला दोन धावा असताना 95 वर सेट होऊन खेळत असलेल्या विल्यमसनला त्याने टाकलेला थोडा आखूड टप्प्याचा चेंडू किंवा जिंकायला एक धाव हवी असताना त्याने थेट बॅटखाली झेप घेणारा टाकलेला यॉर्कर. त्याला फ्रेम करून भिंतीवर लटकवता येणार नाही हे दुर्दैव. पण आधुनिक तंत्रज्ञानामुळे तो क्लिप जपून ठेवू शकतो. ती मॅच 90 अंशात तिथे फिरली आणि पुढचा 90 अंश कोन रोहितने फिरवला. शमीने ‘किलर इन्स्टिंक्ट’ कसं असतं ते दाखवून दिलं. त्याच्या कसबाएवढंच त्याचं टेंपरामेंट आणि डोकं शांत ठेवायची वृत्ती महत्त्वाची.

जवळपास तीच कामगिरी पुढच्या मॅचमध्ये शार्दुल ठाकूरने केली. शमी तसा अनुभवी, शार्दुल नवखाच म्हटलं पाहिजे. काय षटक टाकलं! अशा दबावाच्या क्षणी त्याने फार क्वचित गोलंदाजी टाकली असेल. पण अशा क्षणातलं यश खेळाडूला मॅच्युअर करतं आणि मोठं करतं. शार्दुलने लोखंडाचे चणे आरामात पचवले.

चॅम्पियन संघ कधी तयार होतो, जेव्हा तो कुणा एका खेळाडूवर पूर्णपणे अवलंबून नसतो. जेव्हा प्रत्येक खेळाडूच्या मागे एक खेळाडू संधी मिळाली की ‘खो’ द्यायला तयार असतो. हिंदुस्थानी संघात भुवनेश्वर आहे? पंडय़ा कधी फिट होणार? बुमराहने किंवा रोहित-विराटने विश्रांती घेतली तर चालेल का? वगैरे प्रश्न पडत नाहीत. त्यांची जागा कुणीतरी घेतो. त्यांच्या पायाच्या मापाचे ते बूट नसतात, पण ते बूट घालून पळता येतं. रोहित-विराटच्या पायाचे बूट फिट होणारा पाय अचानक कसा निर्माण होणार? पण एखादा दुसरा खेळाडू ते काम करून जातो. त्यामुळे जायबंदी होऊन घरी परतणारा रोहित पाहून दुःख होते. जमलेल्या गझलांच्या मैफलीतून गुलाम अलीने निघून जावं तसं, पण त्याची जबाबदारी कुणीतरी स्वीकारणार आणि मैफल रंगणार.

राहुलमधला बदल तर डोळे सुखावतो. दीड वर्षापूर्वी मी त्याला इंग्लंडमध्ये ओव्हलवर शतक ठोकताना पाहिलं. त्यावेळी मी पुटपुटलो, ‘काय गुणवत्ता हा फुकट घालवतोय.’ कारण त्याच्या फलंदाजीत सातत्य नव्हतं. एखादी सुंदर मूर्ती शिल्पकलेच्या प्रदर्शनात पहावी तशी त्याची गुणवत्ता होती. क्रिकेटमध्ये त्या मूर्तीला देवपण यायला, तिला सातत्याने केलेल्या धावांच्या आणि जिंकून दिलेल्या मॅचेसच्या मखरात बसवावी लागते. मग देवपण येते. अलीकडे त्याने ते मखर तयार करायला गंभीरपणे घेतलंय. त्यात अचानक यष्टिरक्षणाचा लाभ हिंदुस्थानी संघाला झालाय. त्यामुळे आणखीन एक गोलंदाज किंवा फलंदाज हिंदुस्थानी संघाला घेता येईल. एकेकाळी ही अशी समृद्धी ऑस्ट्रेलिया, विंडीजकडे होती. त्यामुळे ते संघ त्यावेळी सुपर पॉवर्समध्ये गणले जात. आज हिंदुस्थानी संघ तसा आहे. त्याचा अश्वमेधाचा घोडा भरधाव निघालाय.

आपली प्रतिक्रिया द्या