
>> संजय कऱ्हाडे
चला, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या वाढदिवशी आपण विंडीजविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. मालिकेतून आम्ही हे शिकलो, आता पुढे वाटचाल वगैरे म्हणण्याची रीतभातही आटपली. विजय असो!
मात्र ‘कसोटी क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी चांगल्या खेळपट्टय़ा बनवायला हव्यात,’ असंही गंभीर बोलून गेला! आपल्या खेळपट्टय़ा आपल्या घरी आपणच तयार केल्यावर या बोलण्याला काय अर्थ? अहमदाबाद आणि दिल्लीच्या कसोटीसाठी गंभीरशी चर्चा केल्याशिवाय खेळपट्टय़ा तयार केल्या गेल्या यावर माझा तरी विश्वास नाही.
आम्ही भविष्य आणि वर्तमानाकडे डोळा ठेवून संघ निवडतो आणि नितीश कुमारकडे प्रामुख्याने गोलंदाजी करणारा अष्टपैलू म्हणून पाहतो, असंही गंभीर म्हणाला. पण दुसऱया कसोटीत नितीशने चेंडूचा रंग काळा की गोरा हेसुद्धा पाहिलं नाही! अन् पहिल्या कसोटीत त्याने फक्त चारच षटकं टाकली. खेळपट्टी फिरकीला साथ देत होती, असा बचाव तेव्हा केला गेला आणि दिल्ली कसोटीनंतर गंभीर म्हणतोय, ‘…चांगल्या खेळपट्टय़ा बनवायला हव्यात.’ गंमतच आहे!
परस्पर विरोधी विधानं करण्याची ही सवय म्हणावी की तोकडी स्मरणशक्ती की समोरच्याच्या तोंडावर काहीतरी कारणं फेकून बोळवण करण्याची हातोटी?
तसंच, वर्तमानाकडे पाहता आज चौथ्या क्रमांकावर कप्तान शुभमनऐवजी उपकप्तान जाडेजाला फलंदाजीसाठी पाठवता आलं असतं. कारकीर्दीत चार हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी जाडेजाला फक्त दहा धावा हव्या आहेत! पण ते न करता शुभमन फलंदाजीसाठी उतरला. त्यानेही तेरा धावा करून कुठल्या बाभळीचं टोक गाठलं कुणास ठाऊक! आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत जाडेजा हा टप्पा पूर्ण करील. पण महिनाभर आधीच हे साधता आलं असतं. कसोटी क्रिकेटमध्ये तीनशे बळी आणि चार हजार धावा पूर्ण करणारे आजमितीला क्रिकेट जगतात केवळ तीन क्रिकेटपटू आहेत – इंग्लंडचा इयान बॉथम, आपला कपिल देव आणि न्यूझीलंडचा
डॅनियल व्हेटोरी!
असो. काही सूचना – कप्तान आणि प्रशिक्षकाने एकसुरात बोलण्यासाठी प्रत्येक वेळी पूर्वसराव करणं जरुरी आहे! तुमचा एक-न्-एक बोल आमच्या दरबारी यंत्ररूपे जतन होत असतो. सबब, स्मरणशक्ती वेळोवेळी तासणं आवश्यक. भुवया उंचावल्याने, ओठ मुडपल्याने, चेहऱयावर वेगवेगळे हावभाव पाजळल्याने तुम्ही अभिनेता किंवा विद्वान ठरत नाही…
क्रिकेटचा खेळ मोठ्ठा लब्बाड असतो. क्षणभरात आकाशात नेतो अन् क्षणभरातच जमिनीवर आपटतो!