
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन सध्या हिंदुस्थान दौऱ्यावर आहेत. व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय चर्चा संपन्न झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली आणि करारांची घोषणा केली. यातच पर्यटनाबाबत सर्वात महत्त्वाची घोषणा करण्यात आली. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींनी घोषणा केली की, हिंदुस्थान लवकरच रशियन नागरिकांसाठी ३० दिवसांचे मोफत ई-टूरिस्ट व्हिसा आणि ३० दिवसांचे ग्रुप टुरिस्ट व्हिसा जारी करेल.
हे घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांनी सांगितले की, याबाबत दोन करारांवर स्वाक्षर्या झाल्या आहेत. हा निर्णय हिंदुस्थान-रशिया यांच्यातील मजबूत संबंधांना आणखी दृढ करेल, विशेषतः पर्यटन आणि व्यापार क्षेत्रात.
ई-टूरिस्ट व्हिसा म्हणजे काय?
ई-टुरिस्ट व्हिसा हा एक प्रकारचा इलेक्ट्रॉनिक (ऑनलाइन) व्हिसाचा प्रकार आहे. यात अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. याचा अर्थ तुम्हाला व्हिसा कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. पर्यटक प्रवास किंवा नातेवाईकांना भेट देण्यासारख्या उद्देशांसाठी त्यासाठी अर्ज करू शकतात. तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला ईमेलद्वारे इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरायझेशन (ETA) मिळते. हे ऑथोरायझेशन तुमच्या पासपोर्टशी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जोडलेले असते आणि तुम्हाला हिंदुस्थानात प्रवेश करण्याची परवानगी देते. ही प्रक्रिया पारंपारिक व्हिसापेक्षा खूपच सोपी आणि जलद आहे.




























































