वैभव सूर्यवंशीपुढे आफ्रिका होरपळली; हिंदुस्थानचे 19 वर्षांखालील वन डे मालिकेत निर्भेळ यश

विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वैभव सूर्यवंशीने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करीत दक्षिण आफ्रिकेचा दौरा गाजविला. त्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत ३-० फरकाने निर्भेळ यश संपादन केले. तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यातही सूर्यवंशीने ६३ चेंडूंत शतक ठोकून आपला जलवा दाखविला. सामनावीर आणि मालिकावीर हे दोन्ही बहुमान त्यालाच मिळाले, हे विशेष.

सूर्यवंशी, जॉर्ज यांची शतके

१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने ७४ चेंडूंमध्ये १२७धावांची स्फोटक खेळी केली. या खेळीत त्याने १० षटकार आणि ९ चौकारांची आतषबाजी केली. सलामीला उतरलेल्या वैभवने अॅरन जॉर्जसोबत २२७धावांची भक्कम भागीदारी रचली. अॅरन जॉर्जनेही १०६ चेंडूंत १६ चौकारांसह ११८ धावांची खेळी केली. बेनोनी येथील विलोमूर पार्क स्टेडियमवर भारताने ५० षटकांत ७ गडी गमावत ३९३ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या ३५ षटकांत १६० धावांत गारद झाला. किशन सिंहने ३, तर मोहम्मद इनानने २ बळी घेत दक्षिण आफ्रिकेचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

विराट कोहलीच्या विक्रमाजवळ वैभव

१९ वर्षांखालील वन डे क्रिकेटमध्ये हिंदुस्थानसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वैभव सूर्यवंशी आता विराट कोहलीच्या अवघ्या ५ धावांनी मागे आहे. वैभवने १८ सामन्यांत ९७३ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने २८ सामन्यांत ४६.५७च्या सरासरीने ९७८ धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे वैभवची सरासरी (५४.०५) विराटपेक्षा अधिक आहे. या यादीत विजय झोल (३६ सामन्यांत १४०४ धावा) अव्वल स्थानावर आहे. यशस्वी जैस्वाल (१३८६ धावा) दुसऱ्या, तर तन्मय श्रीवास्तव (१३१६ धावा) तिसऱ्या क्रमांकावर आहे. उन्मुक्त चंद, सरफराज खान आणि शुभमन गिल हेही वैभवपेक्षा पुढे आहेत.