21 महिन्यांनंतर हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया भिडणार, रोहित शर्माविना टीम इंडिया मैदानात उतरणार

हिंदुस्थानचा क्रिकेट संघ मार्च महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. विराट कोहलीची ब्रिगेड उद्यापासून ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. दोन देशांमध्ये तीन वन डे, तीन टी-20 व चार कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया व ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सिडनी येथे उद्यापासून वन डे मालिकेला सुरुवात होणार आहे. दोन देशांमधील होणारी ही मालिका सुरक्षित वातावरणात खेळवली जाणार असली तरी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून स्टेडियममध्ये 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. याप्रसंगी उभय देशांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळेल यात शंका नाही. तब्बल 21 महिन्यांनंतर हिंदुस्थानचा संघ ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात टक्कर देणार आहे.

तगडी फलंदाजी वि. अनुभवी गोलंदाजी

हिंदुस्थानकडे वन डे क्रिकेटचा किंग रोहित शर्मा नसला तरी विराट कोहली, शिखर धवन, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल हे स्टार फलंदाज आहेत. शुभमन गिल आणि मयांक अग्रवाल यांच्यापैकी एकाला संघात संधी मिळू शकते. मिचेल स्टार्प, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड या अनुभवी वेगवान गोलंदाजांवर यजमानांची मदार असणार आहे.

सोनीलिव्ह वाहिनीवर थेट प्रक्षेपण

हिंदुस्थान – ऑस्ट्रेलिया यांच्यामधील क्रिकेट मालिकेच्या लढतींचे थेटप्रक्षेपण सोनीलिव्ह वाहिनीवर करण्यात येणार आहे. तसेच चॅम्पियन्स लीग, युरोप लीग, सीरी ए या फुटबॉल स्पर्धांसह मेलबर्न येथे होणाऱया ऑस्ट्रेलियन टेनिस ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेतील लढतींचेही थेट प्रक्षेपण याच वाहिनीवर जगभरातील क्रीडाप्रेमींना पाहायला मिळणार आहे.

हिंदुस्थान – ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेचे वेळापत्रक

पहिली वन डे 27 नोव्हेंबर सिडनी (डे – नाईट)
दुसरी वन डे 29 नोव्हेंबर सिडनी (डे – नाईट)
तिसरी वन डे 2 डिसेंबर पॅनबेरा (डे – नाईट)
पहिली टी-20 4 डिसेंबर पॅनबेरा (नाईट)
दुसरी टी-20 6 डिसेंबर सिडनी (नाईट)
तिसरी टी-20 8 डिसेंबर सिडनी (नाईट)
पहिली कसोटी 17 ते 21 डिसेंबर, अॅडलेड

(गुलाबी चेंडू, डे नाईट)

दुसरी कसोटी 26 ते 30 डिसेंबर, मेलबर्न
तिसरी कसोटी 7 ते 11 जानेवारी, सिडनी
चौथी कसोटी 15 ते 19 जानेवारी, ब्रिस्बेन

(टीप – वन डे लढती हिंदुस्थानी वेळेनुसार सकाळी 9.10 वाजता, टी-20 लढती दुपारी 1.40 वाजता, अॅडलेड कसोटी सकाळी 9.30 वाजता आणि उर्वरीत तीन कसोटी पहाटे 5 वाजता सुरू होतील)

बुमराह, शमीला आलटून-पालटून खेळवणार

z हिंदुस्थानला 17 डिसेंबरपासून सुरू होणाऱया कसोटी मालिकेत विजय मिळवून गावसकर-बॉर्डर ट्रॉफी आपल्याकडे कायम ठेवायची आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वोत्तम वेगवान गोलंदाज फिट राहावेत यासाठी टीम इंडियाचे व्यवस्थापन प्रयत्न करणार आहे. जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी या वेगवान गोलंदाजांला वन डे व टी-20 मालिकेत आलटून पालटून खेळवण्याची शक्यता आहे. अॅरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर, स्टीवन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, मार्पस स्टोयनीस, ग्लेन मॅक्सवेल, अॅलेक्स पॅरी यांना रोखण्याची जबाबदारी युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दुल ठापूर, रवींद्र जाडेजा यांच्यावर असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या