सिडनीत टीम इंडियाच्या अंतिम अकरामध्ये कोण? लोकेश राहुलची दुखापतीमुळे माघार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा ऑस्ट्रेलियन दौरा रोमांचकारी ठरतोय. पहिल्या दोन कसोटींनंतर उभय संघांमध्ये 1-1 अशी बरोबरी झाल्यानंतर आता 7 जानेवारीपासून दोन देशांमध्ये सिडनी येथे तिसऱया कसोटीला सुरुवात होणार आहे. यावेळी हिंदुस्थानी क्रिकेट संघाच्या व्यवस्थापनासमोर अंतिम अकरामध्ये कोणाला संधी द्यायची आणि कोणाला बाहेरचा रस्ता दाखवायचा हा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. उपकर्णधार म्हणून नियुक्त केलेल्या रोहित शर्मा याचे अंतिम अकरामधील स्थान निश्चित आहे. पण सलामीवीर मयांक अग्रवाल व मधल्या फळीतील हनुमा विहारी यांच्यापैकी कोणाला डच्चू देऊन त्याला संघात स्थान देण्यात येतेय हे पाहणे रंजक ठरणार आहे. दरम्यान, लोकेश राहुलला दुखापतीमुळे उर्वरित दोन कसोटींमधून माघार घ्यावी लागली आहे. तसेच उमेश यादवऐवजी शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी आणि टी. नटराजन यांच्यापैकी कोणत्या वेगवान गोलंदाजाला अंतिम अकरामध्ये स्थान मिळतेय हेही पाहायला नक्कीच आवडेल.

खेळपट्टी पाहून तिसरा वेगवान गोलंदाज ठरवणार

ढगाळ वातावरणामुळे सिडनी येथील खेळपट्टी मंगळवारी झाकली होती. त्यामुळे हिंदुस्थानचा तिसरा वेगवान गोलंदाज कोण असेल, याबाबत संघ व्यवस्थापनामध्ये चर्चा झाली नाही. बुधवारी खेळपट्टी पाहून कोणत्या वेगवान गोलंदाजाला खेळवायचे याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. ढगाळ वातावरण असल्यास शार्दुल ठापूरला संधी देण्यात येईल. कारण तो चेंडू स्विंग करण्यात माहीर आहे. पाटा खेळपट्टी असल्यास नवदीप सैनीला संधी मिळू शकतो. तसेच टी. नटराजन याचाही संघात समावेश होऊ शकतो. मंगळवारी त्याने सफेद टी शर्ट घालून सोशल साइटवर फोटो पोस्ट केला आणि कसोटीमध्ये पदार्पण करण्याचे संकेत दिले.

विलगीकरणातील खेळाडूंवर बंदीची शक्यता कमीच

‘बायोबबल’चा नियम मोडल्याप्रकरणी रोहित शर्मा, शुभमन गिल, नवदीप सैनी, रिषभ पंत आणि पृथ्वी शॉ या पाचही खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशीही सुरू आहे. या प्रकरणात हे खेळाडू दोषी सापडल्यानंतरही त्यांच्यावर बंदीची शिक्षा ठोठावण्यात येणार नाही. कारण याआधी ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगदरम्यान ख्रिस लीन व डेन लॉरेन्स या दोन खेळाडूंनी कोरोना नियमाचे उल्लंघन केले होते, पण दोघांनाही बंदीची शिक्षा सुनावण्यात आली नाही. त्यांना फक्त दंड ठोठावण्यात आला होता. त्यामुळे सिडनी कसोटीत रोहित शर्मा, शुभमन गिल, रिषभ पंत या तिघांच्या समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मयांक अग्रवालचा पत्ता कट होणार

मयांक अग्रवालला मागील आठ कसोटी डावांमध्ये अपयशाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्याला सिडनी कसोटीसाठी बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार हे जवळपास निश्चित आहे. अर्थात अद्याप अंतिम निर्णय झालेला नाहीए. मयांक अग्रवालऐवजी टीम इंडियामध्ये रोहित शर्माचे पुनरागमन होईल. तो शुभमन गिलसोबत सलामीला फलंदाजीला येईल. लोकेश राहुलनेही दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे हनुमा विहारीचे मधल्या फळीतील स्थान पक्के आहे. हिंदुस्थानी संघ पाच गोलंदाजांसह पुन्हा एकदा मैदानात उतरणार असल्यामुळे हनुमा विहारीला आपली चमक दाखवावीच लागणार आहे.

पाच खेळाडूंवर बंदी लादल्यास दौरा रद्द होऊ शकतो

क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून विलगीकरणात असलेल्या पाच हिंदुस्थानी क्रिकेटपटूंवर बंदी लादल्यास बीसीसीआयकडून हा दौरा रद्द करण्यात येऊ शकतो. कारण हिंदुस्थानकडे ‘बॅकअप’ खेळाडूच नाहीत. रोहित शर्मा, शुभमन गिल, रिषभ पंत यांचा अंतिम अकरामधील समावेश निश्चित आहे. नवदीप सैनीलाही संधी मिळू शकते. म्हणजे पाचपैकी चार खेळाडू हिंदुस्थानसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.