
हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी मँचेस्टर कसोटीत विजय मिळवणे हिंदुस्थानसाठी अनिवार्य असणार आहे. मात्र मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर इंग्लंडचा फलंदाज ज्यो रूट सातत्याने आपले अधिराज्य गाजवतोय. तो या मैदानावरचा किंग असल्याचे सतत सिद्ध झाल्यामुळे चौथ्या कसोटीत हिंदुस्थानच्या गोलंदाजांपुढे रूट हाच सर्वात मोठा अडथळा असणार हे नक्कीच.
सध्या ज्यो रूट अनेक विक्रम प्रस्थापित करत दिग्गजांना मागे टाकण्याच्या प्रयत्नात आहे. लॉर्ड्सवरील तिसऱया कसोटीत शतक झळकवल्यामुळे रूटचा आत्मविश्वास उंचावलेला दिसतोय. हिंदुस्थानविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये रूटने 50.60 च्या सरासरीने 253 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.
मँचेस्टरमध्ये रूटचा दबदबा कायम पाहायला मिळाला आहे. या मैदानावर तो एक प्रभावी फलंदाज आहे. रूटने मँचेस्टरच्या मैदानावर 11 कसोटी सामन्यांत 19 डावांमध्ये 65.20 च्या सरासरीने 978 धावा पुटल्या आहेत. ज्यामध्ये एक शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्यासारखी फलंदाजी जगभरातील कोणत्याच फलंदाजाला या मैदानावर करता आलेली नाही. या मैदानावर 254 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. हा स्टायलिश फलंदाज सध्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाजांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.
खेळाडू फिट असेलतर खेळायलाच हवे, वर्कलोडच्या मुद्द्यावर वेंगसरकरांची टीका
द्रविड, पॅलिस, पॉण्टिंगला मागे टाकण्यासाठी रूट सज्ज
156 कसोटी सामन्यांच्या 285 डावांमध्ये 50.80 च्या सरासरीने 13,259 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 37 शतके आणि 66 अर्धशतके आहेत. फक्त 30 धावा केल्यास रूट चौथ्या क्रमांकावर पोहोचेल. तसेच तो हिंदुस्थानचा फलंदाज राहुल द्रविड (13,288) यांना मागे टाकेल. तर 120 धावा केल्यास तो दक्षिण आफ्रोचा जॅक पॅलिस (13,289) आणि ऑस्ट्रेलियाचा पॉण्टिंग (13,378) यांचे ही विक्रम मोडीत काढू शकतो. त्यामुळे मँचेस्टरच्या मैदानावर रूट नावाचे वादळ रोखण्यासाठी हिंदुस्थानच्या गोलंदाजांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.