INDvsENG अँडरसनने कुंबळेचा विक्रम मोडला, सर्वाधिक बळी घेणाऱ्यात आता तिसरा क्रमांक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नॉटिंघममध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी लढतीत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने हिंदुस्थानचा दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे याचा विक्रम मोडला. लढतीच्या तिसऱ्या दिवशी अँडरसन याने हिंदुस्थानचा सलामीवीर के.एल. राहुल याला 84 धावांवर बाद केले. हा बळी घेताच अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला.

जेम्स अँडरसन याने सामन्याच्या पहिल्या दिवशी चेतेश्वर पुजारा आणि हिंदुस्थानचा कर्णधार विराट कोहली यांना बाद करत कुंबळेच्या कसोटी क्रिकेटमध्ये 619 बळींची बरोबरी केली होती. शुक्रवारी के.एल. राहुलला बाद करताच तो अनिल कुंबळेच्या पुढे गेला. आता अँडरसन याच्या पुढे श्रीलंकेचा दिग्गज फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन आणि ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू शेन वॉर्न आहे. दोघांच्या नावावर अनुक्रमे 133 कसोटीत 800 आणि 145 कसोटीत 708 बळी आहेत.

दरम्यान, नॉटिंघम कसोटीमध्ये पहिल्या दिवशी हिंदुस्थानने धारधार गोलंदाज केली आणि इंग्लंडचा पहिला डाव 183 धावांमध्ये गुंडाळला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने चार तर मोहम्मद शमीने तीन बळी घेतले. यानंतर मैदानात उतरलेल्या हिंदुस्थानने चांगली सुरुवात केली. रोहित शर्मा आणि के.एल. राहुल या सलामीवीर खेळाडूंनी 97 धावांची सलामी दिली. मात्र यानंतर चार खेळाडू झटपट बाद झाल्याने दुसऱ्या दिवसाखेर हिंदुस्थानची चार बाद 125 अशी अवस्था झाली होती.