आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर मितालीचं ‘राज’, लेडी सचिनचे एका दिवसात दोन विक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लेडी सचिन तेंडुलकर म्हणून ओळखली जाणारी हिंदुस्थानी महिला संघाची कर्णधार मिताली राज हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमांचे इमले रचले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱया एकदिवसीय सामन्यात तर तिने दोन विक्रमांना गवसणी घातली. 38 वर्षीय मिताली राज महिला क्रिकेट विश्वातील सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली असून सर्वाधिक सामने जिंकणारी महिला कर्णधार होण्याचा पराक्रमही तिने केला.

मिताली राजने 317 एकदिवसीय सामन्यांत 10337 धावा केल्या असून तिने इंग्लंडची माजी कर्णधार शार्लेट एडवर्ड्स (309 सामने 10,273 धावा) हिला मागे टाकले. शार्लेट एडवर्ड्सचा विक्रम मोडण्यासाठी मिताली राजला 11 धावांची गरज होती. वेगवान गोलंदाज नॅट सिव्हरला चौकार ठोकत तिने हा टप्पा गाठला. या यादीत न्यूझीलंडची सुझी बेट्स 7849 धावांसह तिसऱया क्रमांकावर आहे.

कर्णधार म्हणून 84वा एकदिवसीय विजय

मिताली राजच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघाने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱया सामन्यात विजय मिळवला. कर्णधार म्हणून मिताली राजचा हा 84वा विजय ठरला. या विजयासह मिताली राज सर्वाधिक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने जिंकणारी कर्णधारही ठरली आहे. तिने ऑस्ट्रेलियाची दिग्गज बेलिंडा क्लार्कचा विक्रम मोडीत काढला आहे. बेलिंडा क्लार्कने ऑस्ट्रेलिया संघाची धुरा सांभाळल्यानंतर 83 एकदिवसीय सामन्यांत विजय मिळवला होता.

सचिन अन् मिताली यांच्यातील साम्य

क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर आणि मिताली राज यांच्यात दोन गोष्टींत साम्य आहे. उभय खेळाडूंनी वयाच्या 16व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुरुषांमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. महिला क्रिकेटमध्ये हा कारनामा आता मिताली राजने केला. वयाच्या 16व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण आणि सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम असे साम्य सचिन तेंडुलकर आणि मिताली राज यांच्या विक्रमांमध्ये जुळून आले आहे.