
> द्वारकानाथ संझगिरी
क्रिकेटमध्ये काही शतपं पाहताना नुसते डोळे खूश होत नाहीत, तर त्यावर मनसुद्धा बसतं आणि मेंदूलाही खाद्य मिळतं. कालचं हिंदुस्थान विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटीतलं के. एल. राहुलचं शतक तसं होतं. त्याच्या आठ कसोटी शतकांतली काही शतपं मी पाहिली आहेत; पण कालचं शतक अगदी सहजपणे त्याचं सर्वोत्कृष्ट शतक होतं.
राहुल फलंदाजीला आला तेव्हा त्याला विविध आव्हानांनी घेरलेलं होतं. एका बाजूने हिंदुस्थानी फलंदाजी कोसळत होती. 4 बाद 92 असा धावफलक रडवेला दिसत होता. त्याने मग समोरच्या टोकाकडून रबाडाच्या एका उत्कृष्ट आऊटस्विंगवर विराट कोहलीला बाद होताना पाहिलं. हिंदुस्थानी फलंदाजीला पडलेलं ते सर्वात मोठं खिंडार होतं. 5 बाद 107 नंतर ते बुजवायला त्याच्याबरोबर दोन अष्टपैलू खेळाडू होते आणि त्यानंतर होतं ते फक्त शेपूट. तो संघातला शेवटचा अस्सल फलंदाज होता.
तर संघाची ही परिस्थिती होती. पण त्याहून महत्त्वाची होती खेळपट्टी. तिच्यात जाळ होता. चेंडू हलत होता आणि उसळत होता. गोलंदाजावर जबाबदारी होती चेंडू फक्त योग्य टप्प्यावर आणि दिशेला टाकणं.
पुढचं कार्य सिद्धीस न्यायला खेळपट्टी समर्थ होती
हे आव्हान सर्वात महत्त्वाचं होतं. ते त्यांनी स्वीकारलं. आधी शार्दुल ठाकूर आणि मग सिराजला बरोबर घेऊन त्यांच्याबरोबर फलंदाजी करताना राहुलने अशी फलंदाजी केली, जणू तो वेगळय़ा खेळपट्टीवर खेळतोय आणि इतर वेगळय़ा खेळपट्टीवर खेळत होते. त्याच्या फलंदाजीमुळे खेळपट्टीतला जाळ विझलेला नाही तरी मंद झाल्यासारखा वाटला, पण तो आभासच होता. समोरच्या फलंदाजाकडे पाहिलं तर खेळपट्टीतला जाळ प्रखरपणे दिसायचा.
त्याच्या खेळीत सर्वात उत्कृष्ट होतं रबाडाला खेळून काढणं. रबाडाने आपल्या चेंडूचा टप्पा आणि दिशा, बाऊन्स आणि वेग यांनी फलंदाजीच्या मुसक्या बांधल्या होत्या. त्याच्या प्रत्येक चेंडूकडे विकेट घ्यायची क्षमता लिहिलेली असायची. पदार्पणवीर डावखुऱया नांद्रे बर्गर या वेगवान गोलंदाजाने त्याला चांगली साथ दिली. पण यान्सन आणि कोत्झी या इतर वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीचा अजिबात उपयोग करता आला नाही. त्याचा फायदा राहुलने उठवला.
कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना चांगल्या चेंडूला आदर दाखवावा लागतो. काही चेंडू सोडावे लागतात. खरं तर कसोटीत चेंडू सोडणे, विशेषतः ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूंना सोडणे ही कला आहे. त्यासाठी फलंदाजाला त्याचा ऑफ स्टंप कुठे आहे, हे ठाऊक असायला लागतं. राहुलला त्याचा ऑफ स्टंप झोपेतही दिसला असता. उसळते चेंडू सोडणे आणि खेळणं, याचं त्याचं तंत्र अप्रतिम होतं. त्याने अत्यंत भक्कमपणे बचावसुद्धा केला. पण हे सर्व करताना त्याचा एक डोळा होता खराब चेंडूवर आणि दुसरा क्षेत्ररचनेवर. जणू क्षेत्ररचनेचे चित्र त्याच्या मनात एखाद्या भिंतीवरील पॅलेंडरप्रमाणे लटकत होतं आणि बदलणाऱया क्षेत्ररचनेप्रमाणे ते बदलत होतं. क्षेत्ररचना आक्रमक असल्यामुळे त्याने फटक्यांसाठी योग्य अशा मोकळय़ा जागा शोधल्या. चेंडू उचलून ड्राईव्ह करताना वन डे, टी-20 चे कसब त्याने पणाला लावले. त्यामुळे तो बचावावर रेंगाळला नाही. उधळलेला घोडा त्याने रोखला, त्याच्यावर स्वार झाला, त्याला लगाम अडकवला आणि घोडय़ाला भरधाव पिटाळले. कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या रात्री नाबाद 70 धावा उशाशी घेऊन तो झोपला. काल शतकाच्या दिशेने त्याने सकाळी कूच केले. मुख्य म्हणजे ते वेगात केले. आठ विकेट्स आधीच पडल्या होत्या. नववी पडली तेव्हा तो 95 धावांवर खेळत होता. आणि अकरावा खेळाडू फलंदाजीला आला. त्याचे नाव प्रसिध कृष्णा. राहुलच्या हृदयाचा चुकलेला ठोका त्याच क्षणी जाणवला. त्याने डोपं वापरून चक्क यष्टिरक्षकाच्या डोळय़ाखाली एक धाव बाय घेतली आणि फलंदाजी स्वतःकडे घेतली. मग षटकार ठोकून त्याने शतकाशी शेकहॅण्ड केले. त्याचे शतक फक्त 133 चेंडूंत झाले होते. त्याच्या ऐंशी धावा चक्क चौकार आणि षटकाराने सजलेल्या होत्या. मग लगेचच बर्गरचा एक आत येणारा चेंडू त्याच्या बचावातून आत शिरला आणि त्याच्या संकटमोचक खेळीला पूर्णविराम मिळाला.
पण तोपर्यंत तो दीर्घकाळ डोळय़ांत आणि मनात रेंगाळावं असं शतक ठोकून गेला होता.



























































