
रविवारी धडाकेबाज विजयी सलामी देणारी टीम इंडिया मंगळवारी (दि. 20) दुसऱया एकदिवसीय क्रिकेट सामन्यात बाजी मारून मालिका जिंकण्यासाठी आतूर झाली आहे. दुसरीकडे यजमान श्रीलंकेला तीन सामन्यांतील या मालिकेत आव्हान राखण्यासाठी विजयाची गरज आहे. हिंदुस्थानच्या दुसऱया फळीतील संघातही अनेक आयपीएल स्टार खेळाडू असल्याने श्रीलंकेपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
सलामीच्या लढतीत कर्णधार शिखर धवनने एक बाजू शांतपणे लावून धरली, तर पृथ्वी शॉ, इशान किशन व सूर्यकुमार यादव यांनी दुसऱया बाजूने आक्रमक फलंदाजी करीत हिंदुस्थानचा विजय सोपा केला. पदार्पणवीर इशान किशन व सूर्यकुमार यादव यांनी पहिल्या चेंडूपासून प्रतिस्पर्धी गोलंदाजीची पिसे काढण्यास सुरुवात केली, यावरून त्यांच्यातील आत्मविश्वास दिसून येतो. दुसऱया सामन्यात हिंदुस्थानी संघात बदल होईल असे वाटत नाही. कारण दुसरा सामना जिंकून मालिका आधीच खिशात घातल्यास तिसऱया सामन्यात युवा खेळाडूंना संधी देता येईल. मनीष पांडेने 40 चेंडूंत संघर्षपूर्ण 26 धावा केल्या. त्यामुळे त्याच्या जागेवर दुसऱया फलंदाजाला संधी दिल्यास नवल वाटायला नको. प्रमुख वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला प्रभावी कामगिरी करता आली नाही. त्याची भरपाई करण्यासाठी त्याचेही हात शिवशिवत असतील. पृथ्वी शॉने धमाकेदार सुरुवात केली होती. दुसऱया सामन्यात त्याच्याकडून आणखी मोठय़ा खेळीची अपेक्षा आहे.
श्रीलंकेला विजय मिळविण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. यजमान संघाकडे अनुभवाची कमतरता आहे. त्यामुळे चांगल्या सुरुवातीनंतर त्यांचा एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. खेळाडूंमध्ये प्रतिभा नक्कीच आहे; पण त्यांना विजयाची कला आत्मसात करून घ्यावी लागेल. मात्र ‘टीम इंडिया’पुढे आव्हानात्मक धावसंख्या उभी करण्याची या श्रीलंकेच्या संघात नक्कीच क्षमता आहे. बघूया उद्याच्या लढतीत ते शिखर धवनच्या सेनेचा कसा प्रतिकार करतात ते.
हिंदुस्थान-श्रीलंका दुसरी वन डे
- वेळ – दुपारी 3पासून
- थेट प्रक्षेपण – सोनी स्पोर्ट्सवर
उभय संघ
- हिंदुस्थान – शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, नितीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, हार्दिक पंडय़ा, कृणाल पंडय़ा, कृष्णप्पा गौतम, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, राहुल चाहर, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, चेतन सकारिया, नवदीप सैनी.
- श्रीलंका – दासून शनाका (कर्णधार), धनंजय डिसिल्वा, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, पथूम निसंका, चरित असलंका, वनिंदू हसरंगा, आशेन बंडारा, मिनोद भानुका, लाहिरू उदारा, रमेश मेंडीस, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमिरा, लक्षण संदाकन, अकिला धनंजय, शिरन फर्नांडो, धनंजय लक्षण, इशान जयरत्ने, प्रवीण जयविव्रेमा, असिथा फर्नांडो, कसून रजिता, लाहिरू कुमारा, इसुरू उदाना.





























































