लस मोहिमेचा वेग वाढणार, हिंदुस्थानला मिळणार पाच कोटी फायझरच्या लस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील कोरोनाविरोधातील लढाईला आता आणखीन वेग मिळणार आहे. लवकरच हिंदुस्थानात फायझरच्या लसींचा मार्ग मोकळा होणार असून या लसीला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यासंदर्भातील केंद्र सरकार आणि अमेरिकन पंपनीची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून येत्या काळात हिंदुस्थानात लवकरच पाच कोटी फायझरच्या लसींचा साठा प्राप्त होणार असल्याची माहितीदेखील पुढे आली आहे. त्यामुळे देशभरातील लसींचा तुटवडा दूर होण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.

हिंदुस्थानात सध्याच्या घडीला कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींच्या वापराला मंजुरी मिळाली आहे. त्यात आता रशियाची स्पुटनिक व्ही ही लस नुकतीच हिंदुस्थानात दाखल झाली असून या लसीलादेखील हिरवा पंदील मिळाला आहे. त्यानंतर आता सर्वांचे लक्ष फायझरच्या लसीकडे लागून राहिले होते. अखेर ही लसदेखील लवकरच हिंदुस्थानात दाखल होणार असल्याचे कळते. फायझर आणि मॉडर्ना या कंपनींनी त्यांच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळावी अशी विनंती केंद्र सरकारकडे केली होती.

त्यानुसार आता या लसीलादेखील मान्यता मिळणार असल्याचे बोलले जात आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या कोरोना लसीकरणाच्या व्यापक कार्यक्रमासाठी अमेरिकन लस उत्पादन करणारी कंपनी फायझरने ‘ना नफा’ या तत्त्वावर म्हणजे कोणताही आर्थिक फायदा न कमावता लसीचा पुरवठी करण्याची ऑफर केंद्र सरकारला दिली होती. त्यासंबंधी सरकारशी चर्चा सुरू आहे अशी माहितीही पंपनीच्या वतीने त्यावेळी देण्यात आली होती.

अमेरिकेत 12 वर्षांवरील बालकांना फायझरची लस मिळणार

अमेरिकेतील 12 वर्षांवरील बालकांना फायझरची कोरोना लस देण्यास अन्न आणि औषध प्रशासनाकडून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. तशा प्रकारची मान्यता याच आठवडय़ात मिळण्याची शक्यता असून पुढच्या आठवडय़ापासून 12 ते 15 वयोगटातील बालकांना कोरोनाची लस देण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अमेरिकेतल्या 16 वर्षांवरील सर्वांना फायझरची लस देण्याच्या निर्णयाला याआधीच मंजुरी मिळाली आहे.

लस ठरतेय प्रभावी

कंपनीने 12 ते 15 वयोगटातील बालकांवर आपल्या लसीच्या उपयुक्ततेचा अभ्यास गेल्या काही महिन्यांपूर्वीच केला आहे. त्यामध्ये ही लस बालकांवरही प्रभावी असल्याचे समोर आले होते.