
>> मंगेश वरवडेकर
मोटेराकडे जाणारे आजचे रस्ते साधे रस्ते वाटत नव्हते. ते जणू इतिहासाच्या दिशेने वळलेले प्रवाह भासत होते. शहराच्या प्रत्येक वळणावरून, प्रत्येक गल्लीतून एकच लाट उसळली होती. ती म्हणजे विजयाच्या जल्लोषाची. लोक मैदानात आले होते फक्त सामना पाहायला नाही, तर एका क्षणाचे साक्षीदार व्हायला. कारण कधी कधी क्रिकेट सामना नसतो; तो नियतीचा नाटय़प्रयोग असतो. आज तो नाटय़प्रयोग हिंदुस्थानने मोदी स्टेडियमवर रंगवत तिसऱयांदा टी-20 वर्ल्ड कपच्या जगज्जेतेपदावर हिंदुस्थानी क्रिकेटचे नाव कोरले. आजचा दिवस पराक्रम नाही तर पराक्रमांचा ठरला.
मोदी स्टेडियम आज इतिहासाचा साक्षीदार झाला. त्या विराट मैदानात आज एक वेगळीच हवा होती. जणू विश्वचषकाची ट्रॉफीही थोडी अधीर झाली होती. ती म्हणत होती ‘मला उचलायला कोण येणार?’ आणि उत्तर आधीच लिहून ठेवल्यासारखं होतं. नियतीने जणू शांतपणे सांगितलं होतं की आज मी हिंदुस्थानच्या तिजोरीतच जाणार. जगज्जेतेपदाच्या तिजोरीवर न्यूझीलंड डल्ला मारणार, असे एकदाही जाणवले नाही. हिंदुस्थानने राजेशाही थाटात टी-20 क्रिकेटचे राजे असल्याचे सिद्ध केले.
क्रिकेटमध्ये बरेच वेळा आपण सर्वस्व पणाला लावून प्रयत्न करतो आणि नियती वेगळंच लिहिते. पण आज प्रयत्न आणि नियती दोघेही एकाच बाजूला उभे होते. प्रत्येक चेंडू, प्रत्येक धाव, प्रत्येक टाळी जणू त्या एका दिशेने चालली होती. शेवटी जे व्हायचं होतं तेच घडलं. हिंदुस्थानने इतिहास रचला. खरं तर इतिहास लिहिला गेला नाही; इतिहास बदलला. इतिहास घडवला. ना कधी यजमान जगज्जेते ठरले होते, ना कधी कुणी जगज्जेतेपदाची राखण केली होती, ना कुणी तीन वर्ल्ड कप आपल्या संघाच्या कपाटात सजवले होते. जे कुणी केलं नव्हतं ते आज हिंदुस्थानने करून दाखवले.
दीड वर्षापूर्वी विजयादशमीनंतरही हातातून निसटलेल्या वर्ल्ड कपने झालेल्या जखमांना भरून काढण्यासाठी संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन या आघाडीवीरांनी धावांचा अक्षरशः वणवा पेटवत न्यूझीलंडसमोर उभारलेले 256 धावांचे खतरनाक आव्हानच विजयाचा पाया होता. हे लक्ष्य म्हणजे हिंदुस्थानी संघाने वर्ल्ड कपला मारलेली घट्ट मिठी होती. ती मिठी न्यूझीलंड जराही सैल करू शकला नाही. त्यांनी प्रारंभीच हार मानली आणि मग उरली फक्त जगज्जेतेपदाचा करंडक उंचावण्याची औपचारिकता.
जसप्रीत बुमराने 15 धावांत 4 विकेट घेत हिंदुस्थानच्या जगज्जेतेपदावर सहा चेंडू आधीच नाव कोरले. अक्षर पटेलने फिन ऍलन, ग्लेन फिलिप्स आणि डॅरिल मिशेल या आक्रमकांच्या विकेट काढत जेतेपदाच्या लढतीतून न्यूझीलंडचीही विकेट काढली.

























































