टीम इंडियाच्या रणरागिणींची धडाकेबाज सुरुवात, पहिल्या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाला धुळ चारली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा महिला संघ सध्या वनडे, टी-20 आणि कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला टी-20 सामना आज (15 फेब्रुवारी 2026) सिडनी येथे पार पडला. या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला DLS नियमानुसार 21 धावांनी पराभवाची धुळ चारली आणि 1-0 अशा फरकाने मालिकेत आघाडी घेतली.

नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 18 षटकांमध्ये 133 धावांवर बाद झाला. टीम इंडियाला जिंकण्यासाठी 134 धावांचे माफक आव्हान मिळाले होते. आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाने आक्रमक सुरुवात केली आणि 5.1 षटकांमध्ये 50 धावा चोपून काढल्या. सलामीवीर शेफाली वर्माने 11 चेंडूंमध्ये 2 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 21 धावा आणि स्मृतीने 17 चेंडूंमध्ये 16 धावांच योगदान दिल. स्मृतीची विकेट गेल्यानंतर जेमिमाने तीन चेंडूंमध्ये नाबाद 9 धावा केल्या. मात्र, पावसाने खोडा घातल्यामुळे सामना होऊ शकला नाही. पावसाच्या व्यत्ययामुळे DLS नियमांनुसार टीम इंडियाला 21 धावांनी विजयी घोषित करण्यात आले.

टीम इंडियाचा दुसरा सामना आता 19 फेब्रुवारी रोजी कॅनबरा इथे खेळला जाणार आहे. त्यानंतर तिसरा टी-20 सामना अॅडलेड येथे 21 फेब्रुवारी येथे खेळला जाईल. त्यानंतर 24 फेब्रुवारीपासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. वनडे मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेन येथे खेळला जाणार आहे. तर 27 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी खेळले जाणारे सामने होबार्ट येथे पार पडणार आहेत. तर, या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामना 6 मार्च रोजी पर्थ येथे खेळला जाईल.