हिंदुस्थानचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत दुसऱ्यांदा लोळवले

अॅडलेड कसोटीत 36 धावांचा नीचांक… दुखापतीमुळे स्टार क्रिकेटपटूंची माघार… मेलबर्न येथील दुसऱ्या कसोटीआधी बॅकफूटवर फेकला गेलेला संघ… ही स्टोरी होती हिंदुस्थानी क्रिकेट संघाची. मात्र विराट कोहलीच्या अनुपस्थितीत मुंबईच्या मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विपरीत परिस्थितीतही ऑस्ट्रेलियात देदीप्यमान आणि ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली.

युवा शुभमन गिल (91 धावा), ‘द वॉल’ चेतेश्वर पुजारा (56 धावा) आणि यष्टिरक्षक रिषभ पंत (नाबाद 89 धावा) यांच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर हिंदुस्थानने ब्रिस्बेन येथील चौथ्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाकडून मिळालेले 328 धावांचे आव्हान लीलया ओलांडले आणि बॉर्डर -गावसकर करंडक 2-1 अशा फरकाने जिंकला. ऑस्ट्रेलियात सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिका जिंकणारा हिंदुस्थान हा पहिला आशियाई संघ ठरला आहे. रिषभ पंतची ‘सामनावीर’ म्हणून तर पॅट कमिन्सची (21 बळी) ‘मालिकावीर’ म्हणून निवड करण्यात आली.

गिल सुसाट

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शुभमन गिल व चेतेश्वर पुजारा या जोडीने हिंदुस्थानचा डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी करताना हिंदुस्थानच्या विजयाची आस कायम ठेवली. या भागीदारीत शुभमन गिलने अपेक्षेप्रमाणे आक्रमक फलंदाजी केली. त्याने 146 चेंडूंत दोन षटकार व आठ चौकारांसह 91 धावांची खेळी साकारली. त्याचे कसोटी कारकीर्दीतील पहिले शतक होणार असे वाटत असतानाच नॅथन लायनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला.

विजयासाठी अजिंक्यच आग्रही होता

शुभमन गिल बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर कर्णधार अजिंक्य रहाणे आला. त्याने 22 चेंडूंत 24 धावांची छोटी, पण आक्रमक खेळी केली. या खेळीत त्याने एक षटकार व एक चौकार मारला. हिंदुस्थानचा संघ यावेळी विजयासाठी खेळत होता हे प्रकर्षाने दिसून आले. पण पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर चेंडू स्लीप किंवा गलीच्या वरून मारण्याच्या नादात तो टीम पेनकरवी झेलबाद झाला.

पुजारा ‘द वॉल’

चेतेश्वर पुजाराने या डावातही त्याच्या शैलीला साजेशी फलंदाजी केली. मात्र ब्रिस्बेन येथील कसोटीच्या पाचव्या दिवसाच्या खेळपट्टीवर त्याने केलेली फलंदाजी लाजवाब होती. त्याने 314 मिनिटे खेळपट्टीवर ठाण मांडत 211 चेंडूंत सात चौकारांसह 56 धावांची खेळी साकारली. पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे आखूड टप्प्याचे चेंडू त्याच्या डोक्याला, हाताला, छातीला लागले. तरीही तो डगमगला नाही. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर तो पायचीत बाद झाला.

मॅचविनर रिषभ

चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर हिंदुस्थानला कसोटी विजयासाठी 100 धावांची आवश्यकता होती. याप्रसंगी रिषभ पंत याने मॅचविनर खेळी साकारली. त्याने मयांक अग्रवाल (9 धावा), वॉशिंग्टन सुंदर (22 धावा), शार्दुल ठापूर (2 धावा) यांच्या साथीने टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने 138 चेंडूंचा सामना करताना एक षटकार व नऊ चौकारांसह नाबाद 89 धावांची संस्मरणीय खेळी साकारली.

दृष्टीक्षेपात

– ऑस्ट्रेलियन संघ 1988नंतर गॅबा येथे कसोटी हरला.

– 1951नंतर गॅबावर तीनशेच्यावर धावांचा यशस्वी पाठलाग केला.

– हिंदुस्थानने सलग तिसऱ्या मालिकेत कांगारूंना हरवले

– बीसीसीआयकडून हिंदुस्थानी संघाला पाच कोटींचे बक्षीस जाहीर.

आपली प्रतिक्रिया द्या