ढाई ‘अक्षर’ गेम के! हिंदुस्थान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत

हिंदुस्थानी संघाने शनिवारी इंग्लंडचा एक डाव व 25 धावांनी धुव्वा उडवत चार सामन्यांची कसोटी मालिका 3-1 अशा फरकाने खिशात घातली.

या मालिका विजयासह टीम इंडियाने या वर्षी जून महिन्यात होणाऱया पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत अगदी दिमाखात प्रवेश केला. जेतेपदाच्या लढतीत आता हिंदुस्थानसमोर न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. हिंदुस्थानने मायदेशात सलग 13 व्या मालिका विजयाला गवसणी घातली. या मालिकेत 32 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवणारा आणि एका शतकासह 189 धावा फटकावणारा रविचंद्रन अश्विन ‘मालिकावीर’ ठरला. तसेच या कसोटीत 101 धावांची खेळी करणाऱया रिषभ पंतची ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली.

अश्विन आणि पटेलने गोऱ्या सायबाला नाचवले

इंग्लंडच्या फलंदाजांना दुसऱ्या डावातही अपयशाचा सामना करावा लागला. रविचंद्रन अश्विन व अक्षर पटेल या फिरकी जोडगोळीसमोर त्यांची दैना उडाली. पाहुण्यांचा दुसरा डाव 135 धावांमध्येच गडगडला. रविचंद्रन अश्विनने 47 धावा देत 5 आणि अक्षर पटेलने 48 धावा देत 5 फलंदाज गारद केले. इंग्लंडकडून डॅन लॉरेन्सने सर्वाधिक 50 धावा केल्या.

विक्रमादित्य

दोन कसोटी मालिकांमध्ये 30पेक्षा जास्त बळी टिपणारा रविचंद्रन अश्विन हिंदुस्थानचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
एका मालिकेत 30 पेक्षा जास्त बळी टिपणारा तसेच एक शतक ठोकणारा रविचंद्रन अश्विन हा जगातील पाचवाच खेळाडू ठरला आहे.
पदार्पणाच्या मालिकेत चार वेळा एका डावात 5 किंवा त्यापेक्षा जास्त बळी गारद करणारा अक्षर पटेल हा हिंदुस्थानचा पहिलाच गोलंदाज ठरलाय.
पदार्पणाच्या मालिकेत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करताना अक्षर पटेल याने सर्वाधिक 27 फलंदाज गारद केले.

आपली प्रतिक्रिया द्या