विराट सेनेचा सर्जिकल स्ट्राइक, पाकचा धुव्वा, विश्वचषकातला सातवा विजय

सामना प्रतिनिधी । मँचेस्टर

विराट कोहलीच्या हिंदुस्थानी संघाने रविवारी क्रिकेटच्या रणांगणात पाकिस्तानी संघावर सर्जिकल स्ट्राईक केला. रोहीत शर्माच्या धडाकेबाज 140 धावा… लोकेश राहुल व विराट कोहलीची दमदार अर्धशतके… अन् कुलदीप यादव, विजय शंकर, हार्दिक पांड्या यांनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने पाकिस्तानचा डकवर्थ लुईस नियमाच्या आधारावर 89 धावांनी धुव्वा उडवला. हिंदुस्थानने वर्ल्ड कपमध्ये सातव्यांदा पाकिस्तानला चिरडले. विराट कोहलीच्या ब्रिगेडने या विजयासह वर्ल्ड कपमधील तिसर्‍या विजयावर मोहोर उमटवली. या वर्ल्ड कपमधील दुसरे आणि कारकिर्दीतील 24वे शतक साजरे करणारा रोहीत शर्मा या विजयाचा हिरो ठरला.

हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यामधील बहुप्रतीक्षित सामना बघण्यासाठी जगभरातून क्रिकेटप्रेमींनी मँचेस्टर येथे धाव घेतली होती. या वेळी ठाणे, दिवा येथील संदेश भगत, राहुल पाटील व नीलेश भोईर या क्रीडाप्रेमींनी आगरी-कोळी टोप्या घालून लढतीचा आनंद घेतला. याप्रसंगी हिंदुस्थानी प्रेक्षकांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो असलेले बॅनर झळकावले होते. त्या बॅनरवर ‘हिंदुस्थान के दो शेर’ असे लिहिण्यात आले होते.

modi-thackeray

नाणेफेकीचा कौल जिंकून पाकिस्तानी कर्णधार सर्फराज अहमदने घेतलेला क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी व्यर्थ ठरविला. रोहीत शर्मा (140) व लोकेह राहुल (57) यांनी सावध सुरुवात केल्यानंतर पाकिस्तानी गोलंदाजीवर हल्लाबोल केला. रोहीत-राहुल जोडीने 23.5 षटकांत 136 धावांची सलामी देत हिंदुस्थानला खणखणीत सुरुवात करून दिली.  

मॅन ऑफ दि मॅच रोहित शर्मा  हिंदुस्थान धावफलक

हिंदुस्थान : लोकेश राहुल झे. बाबर गो. वहाब 57, रोहीत शर्मा झे. वहाब गो. हसन अली 140, विराट कोहली झे. सर्फराज गो. आमीर, हार्दिक पांड्या झे. बाबर गो. आमीर 26, विजय शंकर नाबाद 15. अवांतर : 11, एकूण : 50 षटकांत 5 बाद 336 धावा. गोलंदाजी : मोहम्मद आमीर 10-1-47-3, हसन अली 9-0-84-1, वहाब रियाझ 10-0-71-1

पाकिस्तान : फखर झे. चहल गो. कुलदीप 62, बाबर त्रि.गो. कुलदीप 48, इमाद नाबाद 46. अवांतर : 8, एकूण : 40 षटकांत 6 बाद 212 धावा. गोलंदाजी : कुलदीप  9-1-32-2, विजय 5.2-0-22-2, हार्दिक 8-0-44-2