
हिंदुस्थानी हवाई दलाने ‘जग्वार’ (Jaguar) लढाऊ विमानांची मारक क्षमता वाढवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या विमानांना नेक्स्ट जनरेशन क्लोज कॉम्बैट मिसाइल (NGCCM) आणि प्रगत हेल्मेट माउंटेड डिस्प्ले सिस्टमने (HMDS) सुसज्ज करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने निविदा (Tender) प्रसिद्ध केली आहे.
काय आहेत महत्त्वाचे बदल?
१. जग्वार विमानांमध्ये सध्या वापरल्या जाणाऱ्या जुन्या मॅजिक एअर-टू-एअर मिसाइलच्या जागी आता अत्याधुनिक NGCCM क्षेपणास्त्रे तैनात केली जातील. यासाठी विमानातील संपूर्ण वायरिंग सर्किटमध्ये बदल करण्यात येणार आहे.
२. हेल्मेट माउंटेड डिस्प्ले (HMDS) या नवीन प्रणालीमुळे वैमानिकाला शत्रूच्या विमानाचा अचूक वेध घेणे अधिक सोपे होईल. वैमानिक ज्या दिशेला बघेल, त्याच दिशेला विमानाची शस्त्रप्रणाली लक्ष्य केंद्रित करू शकेल, ज्यामुळे डॉगफाईट (हवाई युद्ध) दरम्यान हिंदुस्थानचे पारडे जड राहील.
३. विमानाची जुनी वायरिंग सिस्टीम बदलून ती नवीन पिढीच्या शस्त्रास्त्रांशी सुसंगत केली जाईल. यामुळे कमी अंतरावरील हवाई युद्धात या विमानांची कार्यक्षमता कैक पटीने वाढणार आहे.
या प्रकल्पासाठी हिंदुस्थानी संरक्षण मंत्रालयाने देशांतर्गत कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले आहेत. ऑनलाईन ओपन टेंडरद्वारे ही प्रक्रिया राबवली जात असून, यामध्ये तांत्रिक आणि व्यावसायिक बोली लावल्या जातील. मेक इन इंडिया अंतर्गत हिंदुस्थानी कंपन्यांना या प्रगत तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी मिळणार आहे.
























































