हिंदुस्थानी हवाई दलाचे सामर्थ्य वाढणार; आठ लढाऊ हेलिकॉप्टर ताफ्यात होणार दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
अपाचे हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे हवाईदलाची ताकद वाढली आहे.

हिंदुस्थानी हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकड्यांनी हिंदुस्थानची धास्ती घेतली आहे. जम्मू कश्मीरमधील कलम 370 रद्द झाल्यानंतर पाकिस्तानकडून युद्धाच्या पोकळ धमक्या देण्यात येत आहेत. मात्र, पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यास आपली सैन्य दले सक्षम आहेत. आता हवाई दलाचे सामर्थ्य वाढणार असून बुधवारी हवाई दलाच्या ताफ्यात आठ लढाऊ हेलिकॉप्टर दाखल होणार आहेत. अमेरिकेची ‘अपाचे एएच 64 ई’ ही आठ लढाऊ हेलिकॉप्टर हवाई दलाच्या ताफ्यात 3 सप्टेंबरला दाखल होणार आहेत. हवाई दलप्रमुख एअर चिफ मार्शल बी. एस. धनोआ यांच्या उपस्थितीत पठाणकोटच्या हवाई तळावर होणाऱ्या कार्यक्रमात ही हेलिकॉप्टर ताफ्यात दाखल होतील.

‘अपाचे एएच 64 ई’ हे जागातील सर्वात अद्ययावत आणि बहुउपयोगी हेलिकॉप्टर असून अमेरिकेच्या लष्कराकडून त्याचा वापर करण्यात येतो. ही लढाऊ विमाने हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याने हवाई दलाची ताकद वाढणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. या हेलिकॉप्टरसाठी हवाई दलाने अमेरिकी सरकार आणि बोईंग लिमिटेड कंपनीशी सप्टेंबर 2015 मध्ये करार केला होता. करारापैकी 4 हेलिकॉप्टर आधीच मिळाली असून आणखी आठ ताफ्यात दाखल होत आहेत. एकून 22 हेलिकॉप्टर हवाई दलाला मिळणार आहेत. या हेलिकॉप्टरची किंमत 4, 168 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. 2015 मध्ये 22 अपाची हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी तीन अब्ज डॉलरचा करार करण्यात आला होता.

या हेलिकॉप्टरमध्ये दोन टर्बोशाफ्ट इंजिन आणि चार ब्लेड असतात. प्रतितास 293 किमी वेगाने उडण्याची या हेलिकॉप्टरची क्षमता आहे. तसेच हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या सेंसरच्या मदतीने ही विमाने रात्री उड्डाण करण्यासही सक्षम आहेत. इराकने अमेरिकी हवाई दलावर हल्ला केला होता, त्यावेळी अपाचे हेलिकॉप्टरने इराकी रडार उद्ध्वस्त करण्याची कामगिरी बजावली होती. अपाचे मध्ये 30 मिलीमीटरची एक एम 230 चेनगन मेन लँडिंग गिअरमध्ये इन्स्टॉल केलेली असते. त्यामुळे हेलिकॉप्टरची स्ट्राइकिंगची क्षमता दुपटीने वाढते. आक्रमक क्षमता वाढवण्यासाठी हिंदुस्थानी हवाई दलाकडून तीन स्क्वॉर्डनची मागणी होत होती. त्यामुळे गरज भासल्यास शत्रूंच्या प्रदेशात घूसून पूर्ण क्षमतेने हल्ला करणे हवाई दलाला शक्य होणार आहे. आता ही हेलिकॉप्टर हवाई दलात दाखल होत असल्याने हवाई दलाचे सामर्थ्य वाढणार आहे.