
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानच्या नापाक इराद्यांचे केंद्र बनलेली लिपा वेली भागातील लष्करी चौकी उद्ध्वस्त करीत हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तानी लष्कराला जोरदार झटका दिला. या भागातून पाकड्यांनी वारंवार युद्धबंदी मोडली होती. शिवाय दहशतवाद्यांना हिंदुस्थानात घुसविण्याचे केंद्र म्हणून या चौकीचा वापर केला जात होता. लिपा वेली भागातील पांडू गावात पाकिस्तानने उभारलेली लष्करी चौकी हिंदुस्थानी जवानांसाठी मोठी डोकेदुखी ठरली होती. कारण या चौकीचा वापर अनेकदा पाकड्यांनी युद्धबंदी मोडून गोळीबार करणे आणि सीमेपार हिंदुस्थानी गावांवर तोफगोळे डागत दहशतवादी टोळ्यांना हिंदुस्थानात घुसविण्यासाठी केला होता. त्यामुळेच रविवारी पांडू भागातील पाकिस्तानी चौकीतून पाक जवानांनी गोळीबार केल्यावर हिंदुस्थानने प्रतिहल्ला चढवला. हिंदुस्थानी जवानांनी पाकला जोरदार प्रत्युत्तर देत पाकची चौकीच नामशेष केली. या प्रकारानंतर एलओसीवर हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

























































