
लेह, लडाख आणि सियाचीनमधील अतिउंच आणि दुर्गम भागात देशरक्षणासाठी तैनात असणाऱया हिंदुस्थानी जवानांच्या जिवाशी केंद्र सरकारच खेळ करीत असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. या जवानांना पुरेसे कपडे, बूट, स्लीपिंग बॅग आणि जेवणही मिळत नसल्याचा ठपका ‘कॅग’ने ठेवला आहे.
कॅगचा हा अहवाल आज संसदेत मांडण्यात आला. केंद्र सरकार आणि संरक्षण मंत्रालयाने जवानांना कसे वाऱयावर सोडले आहे याचा ताळेबंदच या अहवालात मांडण्यात आला आहे. सियाचीन भागात तर वर्षभर बर्फच असतो, पण तेथे तैनात असणाऱया जवानांना स्नो बूट मिळालेलेच नाहीत. अखेर आहे त्याच बुटांवर पुनर्प्रक्रिया करून ते वापरले जात आहेत.
2017 मध्ये सियाचीनमध्ये कपडे आणि अत्यावश्यक सामान नसल्याच्या 64 हजार 131 तक्रारी संरक्षण मंत्रालयाकडे आल्या. मात्र बजेटच नसल्याने यातील खूप कमी तक्रारींचे निवारण झाल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे. नोव्हेंबर 2015 पासून सप्टेंबर 2015 पर्यंत जवानांना बूटच मिळाले नाहीत. संरक्षण मंत्रालयाने केलेल्या खरेदीतही घोटाळा असून जुने फेस मास्क, जुनी जॅकेटस् आणि स्लीपिंग बॅग्ज यांची खरेदी करण्यात आली आहे. मंत्रालयाच्या प्रयोगशाळेत संशोधनच होत नसल्याने अत्यावश्यक सामान आयात करावे लागत आहे.
रेशनही मिळत नाही
नऊ हजार फूट उंचावरील जवानांसाठी विशेष रेशन आणि निवास व्यवस्था करावी लागते. मात्र त्यातही निक्रियताच आहे. लेह, लडाख आणि सियाचीनमधील जवानांना कॅलरीज्चे प्रमाण वाढवण्यासाठी खास जेवण आणि पर्यायी ‘खाना’ दिला जातो, पण संरक्षण मंत्रालयाने त्यातही कंजुषी केल्याचे ‘कॅग’चे म्हणणे आहे. पर्यायी वा पूरक अन्नपुरवठा न झाल्याने या जवानांच्या कॅलरीज्मध्ये तब्बल 82 टक्क्यांची घट झाल्याचे निरीक्षणही कॅगने नोंदवले आहे.




























































