
एलओसीवरील पाकिस्तानी घुसखोरीला प्रत्युत्तर देताना हिंदुस्थानी लष्कराने तंगधारमधील चार दहशतवादी लाँच पॅड व पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या होत्या. या कारवाईने पाकडे पार चवताळले आहेत. त्यामुळेच त्यांनी आठ महिन्यांत चौथ्यांदा हिंदुस्थानी विमानांना पाकिस्तानी हवाई मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इम्रान खान सरकारमधील नागरी हवाई वाहतूक मंत्री गुलाम सरवर खान यांनी ही माहिती दिली.
हिंदुस्थानसाठी पुन्हा आपले आकाश बंद करताना पाकिस्तानने हिंदुस्थानी लष्करावर सतत युद्धबंदी मोडल्याचा आरोप केला आहे. मात्र पाकची ही कारवाई रविवारी हिंदुस्थानी जवानांनी पाकव्याप्त कश्मीरातील दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईचा वचपा म्हणून करण्यात येणार असल्याचे उघड झाले आहे. गेल्या महिन्यात हिंदुस्थानचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही युरोप दौऱयावर जाण्यासाठी पाकिस्तानने आपली हवाई हद्द वापरण्यास बंदी घातली होती.
हवाई प्रवासबंदीचा हिंदुस्थानवर विशेष परिणाम नाही
यंदा ऑगस्ट महिन्यात जम्मू-कश्मीरला विशेषाधिकार देणारे 370 कलम हिंदुस्थानने रद्द केल्यावर पाकने अशीच हवाई प्रवासबंदी केली होती. त्यानंतर बालाकोट हवाई हल्ल्याचा निषेध म्हणून पुन्हा अशीच कारवाई पाकिस्तानने केली होती. यंदा फेब्रुवारी ते नोव्हेंबर म्हणजे आठ महिन्यांच्या अवधीत तीन वेळा पाकने हिंदुस्थानविरोधात अशी हवाई प्रवासबंदी लादली आहे. मात्र आताच्या बंदीमुळे आपल्याला फारसा फरक पडणार नाही. केवळ आपल्या अमेरिका, युरोप आणि मध्य पूर्वेकडे जाणाऱ्या 50 विमानांना 12 मिनिटे वेळ अधिक लागेल.
आधीच भिकेकंगाल झालेला पाकिस्तान मात्र करोडो रुपयांचे हवाई शुल्क गमावणार असल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे. बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानने 139 दिवस आपले आकाश हिंदुस्थानी विमानांना बंद केले होते. त्यामुळे वळसा घालून निर्धारित स्थळी जाण्यासाठी एअर इंडियाला 491 कोटींचे नुकसान सहन करावे लागले होते. पाकलाही करोडो रुपयांच्या शुल्कावर पाणी सोडावे लागले होते.



























































