हिंदुस्थानच्या संविधानाच्या मूळ प्रतीचे ‘असे’ होत आहे जतन!

642

हिंदुस्थान जगातील सगळ्यात मोठा लोकशाहीप्रधान देश आहे. विविधतेने नटलेल्या देशाला आपले ‘संविधान’ एकत्र बांधून ठेवते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या संविधान समितीने देशाचे संविधान तयार केले आणि 26 जानेवारी 1950 रोजी ते लागू झाले. आपल्या देशाचे संविधान आकर्षक स्वरूपात लिहिलेले असावे, अशी इच्छा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या या इच्छेनुसार राज्यघटना सुंदर हस्ताक्षरात लिहिण्याचे काम प्रसिध्द सुलेखनकार प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी 6 महिन्यांच्या अथक परीश्रमाने पूर्ण केले. तर नंदलाल बोस आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी या प्रतीवर सुंदर चित्रे रेखाटली आणि त्याची आकर्षकता आणखी वाढली.

अशा ऐतिहासिक दस्तावेजांचे संरक्षण करणे आव्हानात्मक असते. तितकेच ते जिकरीचे काम आहे. ही संविधानाची मूळ प्रत सुरक्षित ठेवण्यासाठी काय उपाययोजना करता येईल यासाठी संशोधन करण्यात आले. इतर देशांनी त्यांच्याकडील ऐतिहासिक दस्तावेज कशाप्रकारे संरक्षित केले आहेत याचा अभ्यास करण्यात आला. सुरुवातीला ही प्रत विशिष्ट प्रकारच्या कपड्यात गुंडाळून फिनाइलच्या गोळ्यांसोबत ठेवण्यात आली होती. त्यानंतर संशोधन आणि अभ्यास करून ही प्रत हेलियम गॅस चेंबरमध्ये ठेवण्यात आली. त्यामुळे या प्रतीचे उत्तमप्रकारे संरक्षण होत आहे.

हेलियम हा वायू हाइड्रोजनपेक्षाही हलका आहे. तसेच तो ज्वलनशील नाही. अमेरीकेचे संविधान वॉशिंगटनमधील लाइब्ररी ऑफ काँग्रेसमधील हेलियम गॅस चेंबरमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याचा अभ्यास करून आपल्या देशाचे संविधान सुरक्षित ठेवण्यासाठी या तंत्राचा वापर करण्याबाबत विचार करण्यात आला. त्यासाठी अमेरीकेच्या गेट्टी इंस्टीट्यूट, हिंदुस्थानमधील नॅशनल फिजिकल लॅबोरोटरी यांनी चर्चा केली. त्यानंतर 1994 मध्ये संसद भवनातील ग्रंथालयात हे चेंबर तयार करण्यात आले. रायजादा यांनी प्रत लिहिताना त्यातील अक्षरे इटालिक लिहिली होती. हे संविधान काळ्या शाईने लिहिले आहे. ही शाई उडण्याचा धोका असल्याने या चेंबरमध्ये 40 ते 50 टक्के नाइट्रोजन वायूही आहे. त्यामुळे शाई उडण्याचा धोका कमी होतो. तसेच चेंबरमध्ये बाहेरील हवा जाऊ नये, याचीही काळजी घेण्यात आली आहे. दरवर्षी या चेंबरमधील वायू बदलण्यात येतो. तसेच संविधानाच्या मूळ प्रतीची तपासणी करण्यात येते. या प्रतीच्या सुरक्षेसाठी त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असते.

आपली प्रतिक्रिया द्या