
हिंदुस्थानची अर्थव्यवस्था पार कोमात गेली आहे. देशाचा 2019-20 या आर्थिक वर्षाचा विकासदर कसाबसा 4.8 टक्क्यांवर मजल मारेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) सोमवारी वर्तवला. हिंदुस्थानसारख्या देशातील मंदीमुळे वैश्विक विकासदराचा अंदाज घटवल्याचे खापरही आयएमएफने फोडले आहे.
दावोसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या (डब्ल्यूईएफ) बैठकीत आयएमएफने हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. देशाचा विकासदर 2020 पर्यंत 5.8 टक्क्यांवर तर 2021 मध्ये 6.5 टक्क्यांवर जाऊ शकतो, असे या संस्थेने म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षाचा विकासदर 6.1 टक्क्यांवर जाणार असल्याचा अंदाज आयएमएफने याआधी वर्तवला होता. त्यात सोमवारी मोठी घट केली.
अमेरिका-चीनमधील व्यापारी करारामुळे लवकरच जगातील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात सुधारणा घडेल, अशी आशाही व्यक्त केली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर 2019 मध्ये 2.9 टक्के आणि 2020 मध्ये 3.3 टक्के राहील. यात पुढील वर्षभरात सुधारणा दिसेल व विकासदर 3.4 टक्क्यांवर जाईल, असे भाकीत आयएमएफने केले आहे.
5 ट्रिलियन डॉलरचे स्वप्न अधांतरीच
आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ञ गीता गोपीनाथ नेहाल यांनीही याआधी विकासदराबाबत चिंता व्यक्त केली होती. हिंदुस्थानचे 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार होणे कठीण असल्याचे त्या म्हणाल्या होत्या.
हिंदुस्थानातील बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्रातील संकटामुळे देशांतर्गत मागणीत मोठी घट झाली आहे. तसेच कर्ज पुरवठा थंडावला आहे, असे आयएमएफच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक अहवालात म्हटले आहे.
सप्टेंबर तिमाहीत देशाचा विकासदर 4.5 टक्क्यांवर गेला होता. हा सहा वर्षांतील सर्वात कमी दर आहे. सलग सहा तिमाहीत विकासदर ढेपाळला असून मुडीजसह अनेक रेटिंग एजन्सींनी अंदाज घटवला आहे.

























































