अमेरिकेत 11 वर्षे राहिल्याचा पश्चाताप, लाखो रुपये खर्चून न्यूयॉर्कला परतलेल्या इंजिनीयरची व्यथा

अमेरिकन सरकारने एच-1बी व्हिसा शुल्कात केलेल्या वाढीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांच्या नव्या आदेशानंतर व्हिसाची अंतिम मुदत संपण्याच्या भीतीने अनेक जण अमेरिकेत परतू लागले. यातच हिंदुस्थानातील एक सॉफ्टवेअर इंजिनीअर कल्पेश मेहता (नाव बदललेले) यांनी अमेरिकेत परतण्यासाठी विमानाच्या तिकिटावर 8 हजार डॉलर्स पेक्षा जास्त पैसे खर्च केले. अमेरिकेत 11 वर्षे राहिल्याचा पश्चाताप होतोय, अशी खंत त्याने व्यक्त केली.

वडिलांच्या पुण्यतिथीसाठी मेहता हे नागपूरमध्ये आलेले होते, पण त्यांना या निर्णयामुळे अचानक अमेरिकेत परतावे लागले. ट्रम्प यांनी शुक्रवारी परदेशी कुशल कामगारांसाठी असणाऱ्या एच-1बी व्हिसा प्रोग्राम अर्जावर भरमसाट शुल्क लादले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून स्थलांतरितांना रोखणे आणि स्थानिक अमेरिकन नागरिकांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येतंय. मात्र नोकरीसाठी अमेरिकेत जाणाऱ्या लोकांना हा मोठा धक्का आहे.

‘मी आयुष्यात घेतलेल्या निर्णयांचा मला पश्चात्ताप होत आहे,’ असे मत अमेरिकेत आपल्या कुटुंबाबरोबर 11 वर्षे राहिलेल्या मेहता यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, ‘माझ्या आयुष्यातील तारुण्याचा महत्त्वाचा काळ मी या देशासाठी (अमेरिका) काम करण्यात घालवला आणि आता मला असं वाटतंय की माझी इथे गरज नाही. माझ्या मुलीने संपूर्ण आयुष्य अमेरिकेत घालवले आहे. मला कल्पना नाही की तेथून माझं आयुष्य सोडून मी येथे हिंदुस्थानात नवीन सुरुवात कशी करेन,’ असे मेहता म्हणाले. ‘जर थोडासाही उशीर झाला असता तरी मी अंतिम मुदत चुकवली असती,’ असे वक्तव्य मुंबईहून हर्जिन अटलांटिक फ्लाइट पकडून जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या मेहता यांनी केले.

वाढीव व्हिसा शुल्कातून डॉक्टरांना सूट?

एच1बी व्हिसाच्या वाढीव शुल्कातून अन्य देशांतील डॉक्टरांना व वैद्यकीय विद्यार्थ्यांना सूट देण्याचा विचार अमेरिका सरकार करत आहे. ब्लूमबर्ग न्यूज एजन्सीने व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

व्हाईट हाऊसने म्हटलंय की, हे शुल्क एकदाच भरावे लागेल आणि हे शुल्क सध्या व्हिसा असणाऱ्यांना लागू नसेल.