मातीतले खेळ…एकत्रित धावूया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाळ तोरसकर,[email protected]

धावणे हा सांघिक खेळ असतो का? असा प्रश्न आपणास पडला असेल, हो ना? हो, धावण्याच्या शर्यतीतसुद्धा सांघिक खेळ आहे. ती म्हणजे रिले शर्यत!

मागच्या लेखात आपण अडथळा शर्यतीबद्दल जाणून घेतले. आता आपण धावण्याच्या एका सांघिक खेळाबद्दल माहिती करून घेऊया. धावणे हा सांघिक खेळ असतो का? असा प्रश्न आपणास पडला असेल, हो ना? हो, धावण्याच्या शर्यतीतसुद्धा सांघिक खेळ आहे. ती म्हणजे रिले शर्यत! हो, रिले शर्यत हा धावण्यातला सांघिक खेळ आहे. यात चार धावपट्टू भाग घेतात व स्पर्धेचे अंतर सम-समान भागात पार करतात. या प्रकारच्या शर्यतीत 4 X 100, 4 X 200 व 4 4 X 100 मीटरच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. या प्रकारच्या स्पर्धेत 4 X 100 म्हणजे प्रत्येक धावपटूने शंभर-शंभर मीटर अंतर एकापाठोपाठ एकाने धावणे व त्याचवेळी एका लाकडी दांडू (बॅटन) एकाकडून दुसऱयाकडे, दुसऱयाने तिसऱयाकडे व त्याने चौथ्या खेळाडूला देणे व त्या चौथ्या खेळाडूने तिसऱया खेळाडूकडून बॅटन हाती घेत शेवटच्या टप्प्यातील धाव पूर्ण करणे व त्याचवेळी ही स्पर्धा जिंकणे असा असतो. खरं तर या प्रकारच्या स्पर्धेत सर्वच खेळाडूंची जबाबदारी सारखीच असते व सर्वांनी मिळून ही स्पर्धा जिंकावी लागते. या स्पर्धेत एका खेळाडूने दुसऱया खेळाडूला बॅटन देणे हा एक महत्त्वाचा भाग असतो. एका खेळाडूने बॅटन दुसऱया खेळाडूला देतेवेळी खुपच काळजी घ्यावी लागते. ती बॅटन न पडता एकाकडून दुसऱयाकडे देणे महत्त्वाचे असते. जर ती बॅटन खाली पडली तर मात्र ती त्यानेच उचलावी, ज्याच्या हातून ती खाली पडलेली असते व पुढील अंतर पार करावे.

बॅटन हातात घेतल्यावर किंवा अदलाबदली झाल्यावर पुढच्या खेळाडूने आपल्याच पट्टय़ावर धावणे महत्त्वाचे असते. विनाकारण दुसऱया खेळाडूस त्रास देऊ नये. असा हा खेळ 1912 साली ऑलिंपिकमध्ये समाविष्ट झाला आहे. रिले शर्यतीत बॅटनची अदलाबदल साधारणपणे तीन प्रकारे करतात. पहिली पद्धत म्हणजे अंदाजाने दृष्टी समोर ठेवून बॅटन हातात घेणे. ज्यावेळी बॅटन हातात घेतात त्यावेळी साधारणपणे पुढे धावणाऱया खेळाडूचा हात मागे ताठ व पिरगळलेल्या स्थितीत असतो. म्हणजेच हाताच्या मागील बाजू जमिनीकडे असते तर तळवा आकाशाकडे असतो व अंगठा आतील बाजूस असतो व त्याच स्थितीत बॅटन हातात घ्यावा.

मागचा खेळाडू दहा-बारा पावले मागे असतानाच पुढचा खेळाडू धावण्यास सुरवात करतो व आपली दृष्टी समोर ठेवून हात मागे ठेवत धावत सुटतो व त्यावेळी मागच्या खेळाडूकडून अंदाजाने बॅटन हातात घेत पुढे धावत जावे हा पहिला प्रकार आहे. दुसऱया प्रकारात उजवा हात कमरेवर ठेवून बॅटनची अदलाबदल करणे. यात पुढचा खेळाडू बॅटन अदलाबदल क्षेत्राच्या खुणेजवळ उभा असतो. त्यावेळी तो आपला उजवा हात कमरेवर ठेवून उभा राहतो. पंजाची चारही बोटे काहीशा वाकलेल्या अवस्थेत असतात व अंगठा समोर असतो. तळहाताची पोकळी तयार होते. हात कोपरात वाकवून त्यातून मागे पहात मागचा खेळाडू 10-12 पावलांवर असताना धावण्यास सुरवात करावी व मागच्या खेळाडूने त्यास गाठत पुढच्या खेळाडूच्या उजव्या हाताच्या पोकळीत बॅटन ठेवावी. त्यामुळे बॅटन खाली पडण्याची शक्यता फारच कमी असते. उजवा हात मागे घेण्याच्या सुमारास त्यात बॅटन ठेवला जातो. मात्र या प्रकारचा नियमित सराव करावा लागतो. त्यामुळे बॅटन बदलणे सहज शक्य होते.

तिसऱया प्रकारात मागे पहात बॅटन हातात घेणे. यात पुढचा खेळाडू बॅटन अदलाबदल क्षेत्राच्या खुणेजवळ उभा असतो. त्यावेळी तो खेळाडू मागचा खेळाडू 10-12 पावलांवर असताना मागे पहात धावण्यास सुरवात करतो व तोपर्यंत तो मागचा खेळाडू पुढच्या खेळाडूस गाठून त्याच्या हातात वरुन बॅटन देतो. या पद्धतीत खेळाडू बॅटन हातात मिळेपर्यंत मागे पहात राहतो. त्यामुळे त्याच्या वेगात अडथळा होतो म्हणून ही पद्धत आता कमी वापरात आहे.

खरं तर धावताना आपल्या शरीराला विविध व्यायाम मिळतात. धावण्यामुळे आपले पाय तर मजबूत होतातच, शिवाय आपली शारीरिक क्षमतासुद्धा वाढते. श्वसनक्रिया अतिशय चांगली होते. आपले विविध स्नायू मजबूत होतात. त्यामुळे निरोगी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने रोज सकाळी धावण्याचा सराव केला पाहिजे. त्यासाठी वयाचे कोणतेही बंधन पाळू नये.