ही दोस्ती तुटायची नाय… सीमावाद सुरू असतानाही हिंदुस्थानने नेपाळसोबत ‘मैत्री’ निभावली

8058

चीनची फुस असल्याने नेपाळमधील कम्युनिस्ट सरकार सध्या हिंदुस्थानला डोळे वटारत आहे. नेपाळने नवीन नकाशा तयार करून हिंदुस्थानच्या भूभागावर दावा ठोकला. नेपाळने विनाकारण सीमावाद उकरून काढला असला तरी हिंदुस्थानने आपली मैत्री निभावत दोन्ही देश नैसर्गिक मित्र असल्याचे दाखवून दिले. या तणावाच्या काळात नेपाळने हिंदुस्थानपुढे मदतीसाठी हात पसरला आणि हिंदुस्थाननेही कोणतेही आढेवेढे न घेता नेपाळला मदत केली.

कोरोना संकटकाळात ऑस्ट्रेलियामध्ये एका नेपाळी नागरिकावर मेडिकल एमर्जन्सीची वेळ आली असता हिंदुस्थानने तात्काळ मदत पोहोचवली.विदेशात अडकलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना आणण्यासाठी गेलेल्या एअर इंडियाच्या विशेष विमानाने तीन नेपाळी नागरिकांना दिल्लीत आणण्यात आले. त्यांच्यावर दिल्लीतच उपचार होणार असून एका नेपाळी नागरिकाचे बोनमॅरो ट्रान्सप्लांट होणार आहे. दुसरा व्यक्ती रुग्णांचा भाऊ असून तो बोनमॅरो दान करणार आहे. त्यांच्यासोबत त्यांचे वडीलही आहेत.

...म्हणून मदत
हिंदुस्थान आणि नेपाळ यांची पुरातन काळापासून मैत्री आहे. नेपाळला हिंदुस्थानने नेहमीच मदत केली आहे. सीमावाद सुरू असतानाही या मैत्रीपूर्ण भावनेनेच हिंदुस्थानने नेपाळला मदत केली. 1950 ला झालेल्या करारानुसार नेपाळी नागरिकांना देखील हिंदुस्थानी नागरिकांइतक्या सुविधा आपला देश देतो. यामुळे चीन जरी दोन्ही देशात फूट निर्माण करायचा प्रयत्न करत असला तरी हिंदुस्थान कुटनीतीने याचा सामना करण्यास समर्थ असल्याचे दाखवून दिले.

वादास कारण की…
नोव्हेंबर 2019 मध्ये हिंदुस्थानच्या गृहमंत्रालयाने नकाशा जारी केला होता. ज्यात कालापानीचा समावेश होता. यामुळे नेपाळ सरकार नाराज झाले. तसेच कालापानीच नाही तर लिपुलेख हा भागही आमचा आहे, असा दावा नेपाळने केला. काही दिवसांपूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कैलास मानसरोवरला जाण्यासाठी 80 किलोमीटरच्या रस्त्याचे उद्घाटन केले होते. हा रस्ता लिपुलेख भागात संपतो. यावरूनही नेपाळने आक्षेप घेतला होता. नेपाळला चीनची फुस असल्याचे दिसते.

आपली प्रतिक्रिया द्या