
हिंदुस्थानी वंशाचा अनोळखी महेश तांबे अचानक क्रिकेटविश्वात सर्वांच्या ओळखीचा झाला. त्याने फिनलँड संघाकडून खेळताना टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद सुपरफास्ट फाइव्ह म्हणजेच पाच विकेट मिळवत नवा विश्वविक्रम रचला. त्याने एस्टोनियाविरुद्धच्या तिसऱया आणि निर्णायक टी-20 सामन्यात त्याने केवळ पहिल्या नऊ चेंडूंमध्ये अर्धा संघ गारद केला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास घडवला.
प्रथम गोलंदाजी करणार्या फिनलँडकडून महेश तांबेला पहिले षटक 17 व्या षटकात देण्यात आले. 5 बाद 112 अशा स्थितीत असलेल्या एस्टोनियाला तांबेने हादरवले. त्याला पहिल्या दोन चेंडूंवर साहिल चौहानने सलग षटकार आणि चौकार लगावला. मात्र त्यानंतर पुढील पाच चेंडूंवर तांबेने तीन विकेट टिपल्या. यात त्याने एक चेंडू वाईडही टाकला. मग पुढच्या षटकांत पहिल्या दोन चेंडूंवर आणखी विकेट घेत हॅटट्रिकही साजरी केली आणि 9 चेंडूंत सुपरफास्ट 5 विकेट घेण्याचा विश्वविक्रम केला. त्याच्या या कामगिरीमुळे एस्टोनियाचा डाव 141 धावांवर आटोपला. तांबेने 19 धावांत 5 विकेट टिपल्या. मग त्यांनी अरविंद मोहनच्या 67 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर 19 व्या षटकांत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले आणि मालिका 2-1 नेही जिंकली.