Mehul Goswami – शासकीय सेवेत असतानाही दुसरी नोकरी करणे भोवलं; कर्मचाऱ्याला अटक, 15 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता

शासकीय सेवेत असतानाही दोन नोकऱ्या करणाऱ्या हिंदुस्थानी वंशाच्या 39 वर्षीय तरुणाला अमेरिकेमध्ये अटक करण्यात आली आहे. मेहुल गोस्वामी असे या तरुणाचे नाव आहे. दोन दोन नोकऱ्या करत सरकारची फसवणूक करणे आणि सरकारला 50 हजार डॉलर्स (44 लाख रुपये) चा चुना लावण्याचा आरोप त्याच्यावर आरोप आहे. याच प्रकरणी त्याला बेड्या ठोकण्यात आल्या असून त्याला 15 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

मेहुल न्यूयॉर्क स्टेट ऑफिस ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सर्व्हिसेससाठी (आयटीएस) काम करत होता. तिथे तो रिमोट एम्प्लॉई अर्थात घरून काम करत होता. मात्र चौकशीत तो सरकारला चुना लावून न्यूयॉर्कमधील मास्टा येथे दुसरी पूर्णवेळ नोकरी करत असल्याचे आढळून आले. एका निनावी ई-मेलमुळे मेहुलचा भंडाफोड झाला.

मेहुल गोस्वामी हा शासकीय सेवेमध्ये प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर या पदावर कार्यरत होता. 2024 मध्ये त्याचा वार्षिक पगार 117891 डॉलर (जवळपास 98 लाख रुपये) होता. मात्र 2022 पासून त्याने माल्टा येथील ग्लोबल फाऊंड्रीज या सेमीकंडक्टर फर्ममध्ये कंत्राटदार म्हणून दुसरी नोकरी सुरू केली. याचाच अर्थ तो शासकीय सेवेच्या नावाखाली सरकारकडून मोठा पगारही घेत होता आणि दुसरीकडे पूर्णवेळ नोकरीही करत होता. अशा प्रकारे त्याने सरकारची फसवणूक करत लाखोंचा चुना लावला.

न्यूयॉर्कचे सब इन्स्पेक्टर जनरल ल्युसी लँग यांनी या प्रकरणात कठोर टिप्पणी केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांवर प्रामाणिकपणे काम करण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली असते, मात्र गोस्वामी यांनी त्यांच्या कृतीने विश्वासाला तडा गेला आहे. राज सरकारसाठी काम करण्याचे नाटक करत त्यांनी पूर्णवेळ दुसरी नोकरी केली आणि हा करदाऱ्यांच्या पैशाचा गैरवापर आहे, असे लँग म्हणाले.

दरम्यान, गोस्वामी यांना 15 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली असून त्यांचा गुन्हा क वर्ग श्रेणीतील आहे. यात त्यांना जास्तीत जास्त 15 वर्षांची अजामीनपात्र तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.