
लॉकडाऊनमध्ये अनेक क्षेत्रात मंदी असताना हिंदुस्थानच्या पोस्ट बँकेने कोटींची उड्डाणे घेतली आहे. लॉकडाऊन काळात बँकेच्या माध्यमातून हजारो कोटींचे व्यवहार झाले असून बँकेच्या ग्राहकांमध्येही कमालीची वाढ झाली आहे. हिंदुस्थानी पोस्ट बँकेने आधार आधारित बँकिग प्रणाली राबवल्याने गाव खेड्यातील नागरिकांनाही याचा मोठा फायदा झाला आहे.
एक सप्टेंबर 2018 रोजी हिंदुस्थानी पोस्ट बँकेचा व्यवहार सुरू झाला होता. गेल्या दोन वर्षात बँकेला 3.6 कोटी ग्राहक मिळाले आहेत. त्यापैकी अडीच कोटी ग्राहक हे एका वर्षात वाढले आहेत. 15 सप्टेंबर 2020 पर्यंत बँकेने 38 हजार 500 कोटींचे व्यवहार पूर्ण केले आहेत.
देशात 23 मार्च रोजी लॉकडाऊन जारी करण्यात आला. या काळात बँकेने 5 हजार 362 कोटींचे व्यवहार केले. आधार आधारित प्रणालीद्वारे बँकेतून 6 हजार 100 कोटींहून अधिक रुपये वितरित करण्यात आले. बँकेत आतापर्यंत 33 हजार 600 कोटींचे व्यवहार केले असून गेल्या एक वर्षात पाच पटीने ठेवी वाढल्या आहेत. लॉकडाऊन काळात केंद्र सरकारकडून मजूर आणि शेतकर्यांच्या थेट खात्यात रक्क्म जमा करण्यात आली होती. हिंदुस्थान पोस्ट बँकेच्या माध्यमातून ही रक्कम थेट लाभार्थ्यांना देण्यात आली.
























































