
केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) आगामी हंगामाच्या तारखांची मंगळवारी (दि. 6) अधिकृत घोषणा केली. आयएसएलचा नवा हंगाम 14 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, सर्व 14 क्लब या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. व्यावसायिक भागीदारांच्या कमतरतेमुळे आयएसएलचा हंगाम अद्याप सुरू होऊ शकला नव्हता. त्यामुळे गेल्या काही काळापासून लीगच्या आयोजनावरून वादही निर्माण झाले होते. अखिल हिंदुस्थानी फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) नुकतेच आयएसएलच्या तारखांची घोषणा आगामी आठवडय़ात केली जाईल, असे संकेत दिले होते. त्यानुसार आता अधिकृत घोषणा झाल्याने अनिश्चिततेचे सावट दूर झाले आहे. क्रीडामंत्री मांडविया म्हणाले, ‘आयएसएलबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, आज सरकार, फुटबॉल महासंघ तसेच मोहन बागान, ईस्ट बंगालसह 14 क्लब्जची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत आयएसएल 14 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


























































