रेल्वेतून जास्तीचं सामान न्याल तर महागात पडेल, ट्रेन प्रवासात विमानासारखी नियमावली लवकरच

रेल्वे प्रवासात अनेकदा मोठ्या प्रमाणात सामान वाहून नेले जाते. यासंदर्भात लवकरच नवा नियम लागू होणार आहे. त्यानुसार विशिष्ट वजन किंवा जास्त सामान वाहून नेल्यास प्रवाशांना दंड भरावा लागेल. त्यासाठी रेल्वे स्थानकांवर इलेक्ट्रॉनिक्स मशीन बसवल्या जाणार आहेत. या मशीनच्या मदतीने सामानाचे वजन निर्धारित आहे की नाही ते समजेल. सामानाची मर्यादा डब्याच्या श्रेणीनुसार ठरवली जाईल. म्हणजे जर कुणी जनरल डब्याचे तिकीट काढून प्रवास करत असेल तर त्याला 35 किलोपेक्षा जास्त सामान नेण्याची परवानगी नसेल. एकापेक्षा अधिक लोक प्रवास करत असतील तर, प्रत्येक प्रवाशानुसार निश्चित मर्यादा असेल.

प्रवासी रेल्वेतून वाट्टेल तितके सामान नेतात. त्यामुळे सीटवर बसलेल्या किंवा डब्यातून चालणाऱ्या प्रवाशांना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागतो. अतिरिक्त लगेज म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने जोखीम असल्याचे मानले जाते.

तपासणीदरम्यान मर्यादेपेक्षा जास्त किंवा बिना बुकिंगचे सामान सापडले तर सामान्य दरापेक्षा जास्त शुल्क भरावे लागेल. प्रवाशांना आपल्यासोबत 10 किलोपर्यंतचे अतिरिक्त सामान न्यायची सूट असेल. त्यावर लगेज बुक करावे लागेल.

किती आहे लगेज मर्यादा?

जनरल डब्यासाठी प्रति व्यक्ती 35 किलो, स्लीपर डबा आणि थर्ड एसीमध्ये प्रति व्यक्ती 40 किलो सामान नेता येईल. सेकड एसीमध्ये प्रति व्यक्ती 50 किलो सामान तर फर्स्ट एसीमध्ये ही मर्यादा 70 किलो एवढी असेल.

सर्व प्रवाशांचा प्रवास आनंददायी आणि सुरळीत व्हावा, यासाठी लगेज मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. बसण्याच्या व्यवस्थेनुसार सामान ठेवता यावे, यासाठी हे निश्चित करण्यात आले आहे. उदाहरणार्थ जनरल डब्यामध्ये जागा कमी असते. त्यामुळे तिथे सामान मर्यादा कमी आहे. सेकंड एसी डब्यात सलग दोनच जागा असतात. त्यामुळे तिथे जास्त सामान नेता येईल असा नियम करण्यात येतोय.