हिंदुस्थानी तिरंदाजांना दुहेरी धक्का;दक्षिण आशियाई गेम्समधील सहभागावरही बंदी

353

टोकियो ऑलिम्पिक (2020) काही महिन्यांवरच असतानाच हिंदुस्थानच्या तिरंदाजांना दुहेरी धक्का बसला आहे. आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियावर निलंबनाची शिक्षा ठोठावण्यात आल्यामुळे आशियाई तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये हिंदुस्थानी तिरंदाज जागतिक तिरंदाजी संघटनेच्या झेंडय़ाखाली खेळताना दिसणार आहेत. याचसोबत दक्षिण आशियाई तिरंदाजी संघटनेनेही दक्षिण आशियाई गेम्समधील हिंदुस्थानी खेळाडूंच्या सहभागावर बंदी आणली आहे. यामुळे आता आगामी काळ हा हिंदुस्थानी तिरंदाजांसाठी खडतर असणार यात शंका नाही

जागतिक तिरंदाजी संघटनेकडून आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियाला निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे आता हिंदुस्थानी खेळाडूंना विभागीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करता येणार नाही. त्यामुळे दक्षिण आशियाई तिरंदाजी संघटनेनेही 1 ते 10 डिसेंबर या कालावधीत नेपाळमध्ये रंगणाऱया दक्षिण आशियाई गेम्समधील हिंदुस्थानी खेळाडूंच्या सहभागावर बंदी आणली आहे.

महिला खेळाडूंचे टेन्शन वाढले

आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियावरील निलंबनामुळे हिंदुस्थानच्या महिला तिरंदाजांचे टेन्शन वाढले आहे. ंिहंदुस्थानी महिला खेळाडूंना रिकर्व्ह प्रकारात अद्याप टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट बुक करता आलेले नाही. तसेच हिंदुस्थानी पुरुष व महिला रिकर्व्ह प्रकारात जागतिक संघटनेचे प्रतिनिधित्व करणार असल्यामुळे आशियाई स्पर्धेत या खेळाडूंनी पदक जिंकल्यास ते हिंदुस्थानच्या नावावर नसेल ही खेदजनक बाब.

आपली प्रतिक्रिया द्या