ज्याला आधार दिला, त्यानेच काटा काढला; हिंदुस्थानी विद्यार्थ्याची अमेरिकेत निर्घृण हत्या

अमेरिकेतील जॉर्जियामध्ये आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेलेल्या एका हिंदुस्थानी मुलाची अमानुष हत्या करण्यात आली आहे. येथे एका बेघर व्यक्तीने त्या विद्यार्थ्याच्या डोक्यावर हातोड्याने वार करून त्याची हत्या केली. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

विवेक सैनी (b/ – 25) असे या मृत मुलाचे नाव असून जूलियन फॉकनर असे त्या आरोपीचे नाव आहे. विवेक हा उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेला होता. तो जॉर्जियातील लिथोनिया येथील एका दुकानात पार्टटाईम काम करायचा. त्यावेळी जूलियन हा राहण्यासाठी जागा शोधत त्याच्या दुकानात आला होता.

विवेकने आणि त्याच्या सहकर्मचाऱ्याने माणुसकीच्या नात्याने जूलियनला दोन दिवस दुकानातच राहाण्यासाठी जागा दिली. तसेच कर्मचाऱ्यांनी त्याला चिप्स, सरबत, पाणी आणि थंडी लागू नये म्हणून एक जॅकेटही दिले. दोन दिवसानंतर विवेकने जूलियनला दुकानातून निघून जाण्यास सांगितले. तसे न केल्यास आम्ही पोलिसांना फोन करू, असे विवेकने सांगितले.

त्यामुळे जूलियनला विवेकचा प्रचंड राग आला आणि त्याने विवेकच्या डोक्यावर हातोड्याने 50 वेळा वार केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा जूलियन विवेकच्या मृतदेहावर निडरपणे उभा होता. पोलिसांनी लगेचच आरोपीला ताब्यात घेतले आणि विवेकला जागीच मृत घोषित करण्यात आले.

दरम्यान, विवेकचे कुटुंब हरयाणातील बरवालामध्ये राहतात. त्याने चंदीगड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केले होते. नंतर अलाबामा विद्यापीठातून व्यवसाय प्रशासनातही पदवी घेतली होती. यानंतर उच्च शिक्षणासाठी दोन वर्षांपूर्वीच तो अमेरिकेत गेला होता. विवेकच्या हत्येमुळे कुटुंबीयांना धक्का बसला आहे. विवेकचा मृतदेह हिंदुस्थानात आणला असून त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.