खेळाडूंनी कमरेच्या खाली तिरंगा लावल्याने वाद, हिंदुस्थानी वॉटरपोलो संघाच्या कृत्याने संतापाची लाट

नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानी पुरुष वॉटर पोलो संघाच्या खेळाडूंच्या स्विमिंग ट्रक्सवर कमरेच्या खाली तिरंगा ध्वज दर्शवण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. हा प्रकार प्रोटोकॉलचा भंग मानला जात असून क्रीडा मंत्रालय आणि हिंदुस्थान ऑलिम्पिक संघटना (आयओए) यांनी यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय ध्वजाची प्रतिष्ठा आणि संवेदनशीलता लक्षात घेता, हा मुद्दा गांभीर्याने घेतला जात आहे.

स्पर्धेतील काही व्हिडीओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) कडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. हा प्रकार फ्लॅग कोड 2002 आणि राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक अधिनियम 1971च्या उल्लंघनात मोडतो, कारण या नियमांनुसार राष्ट्रीय ध्वज कंबरेखालील कोणत्याही वस्त्रावर दर्शवता येत नाही. वॉटरपोलो संघाच्या या पृत्यामुळे देशभरात संतापाची लाठ उसळली आहे.

एसएफआयने मान्य केली चूक

‘एसएफआय’च्या एका अधिकाऱयाने ही चूक मान्य करत सांगितले की, झालेली चूक सुधारण्यात येईल. पुढील सामन्यांमध्ये याची पुनरावृत्ती होणार नाही. इतर देशांच्या संघांकडे त्यांच्या गणवेशावर राष्ट्रीय ध्वज असतो, पण हिंदुस्थानात आपण या विषयाची संवेदनशीलता ओळखून निर्णय घ्यावा लागतो!

क्रीडा मंत्रालयाचा कडक इशारा

क्रीडा मंत्रालयाने ‘एसएफआय’ला तत्काळ सुधारणा करण्याचे आणि सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ही चूक जाणूनबुजून झाली नसली तरी राष्ट्रीय ध्वजाच्या सन्मानाशी संबंधित असल्यामुळे दुर्लक्ष करता येणार नाही. मंत्रालयाच्या एका अधिकाऱयाने सांगितले की, अहवाल आल्यानंतर जबाबदार व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाईचा विचार केला जाईल.

आंतरराष्ट्रीय नियम आणि तज्ञांचे मत

जागतिक अॅथलेटिक्स महासंघाच्या नियमानुसार, खेळाडूंना त्यांच्या पोशाखावर राष्ट्रीय ध्वज दाखवणे बंधनकारक नाही. तो निर्णय संबंधित देश आणि खेळाडूंच्या इच्छेवर अवलंबून असतो. तज्ञांच्या मते, हिंदुस्थानी जलतरणपटूंनी ट्रक्सऐवजी स्विमिंग कॅपवर तिरंगा दाखवला असता तर वाद टाळता आला असता.