हिंदुस्थानात नागरिकांचे सरासरी आयुष्य वाढले, केरळात सरासरी आयुर्मान 77.3 वर्षे तर यूपीत 66.9 वर्षे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी नागरिकांचे सरासरी आयुर्मान (आयुष्य) गेल्या 30 वर्षांत किमान 10 वर्षांनी वाढले आहे. पण विशेष म्हणजे देशातील विविध राज्यांत आयुर्मानाची ही सरासरी वेगवेगळी आहे. केरळमध्ये ही सरासरी सर्वाधिक म्हणजे 77.3 वर्षे असून उत्तर प्रदेशात 66.9 वर्षे असे आहे. अमेरिकेच्या लॅन्सेट जर्नलने केलेल्या अभ्यासाच्या अहवालातून आयुर्मान वाढीची ही माहिती प्रसिद्ध झाली आहे.

लॅन्सेटच्या अभ्यासानुसार जगभरातील नागरिकांच्या आयुर्मानाची सरासरी 1990 मध्ये 59.6 वर्षे होती. पण 2019 मध्ये ती वाढून 70.8 वर्षे इतकी झाली आहे. विविध आजारांवर निघालेले उपचार आणि हायटेक राहणीमानामुळे जगातील नागरिकांचे आयुर्मान गेल्या काही वर्षांत वाढले आहे. हिंदुस्थानी नागरिकांच्या सरासरी आयुर्मानातही गेल्या 30 वर्षांत मोठी वाढ झाली आहे. उत्तम राहणीमान, सुधारलेली वैद्यकीय व्यवस्था आणि विज्ञानाच्या प्रगतीमुळे हे शक्य झाल्याचे लॅन्सेट जर्नलमध्ये आपले शोध निबंध मांडणाऱया संशोधकांनी म्हटले आहे. हिंदुस्थानातील वेगवेगळ्या राज्यांतील मानवी आयुर्मानाची सरासरी ही त्या राज्यांतील नागरिकांचे राहणीमान आणि त्यांना मिळणाऱया वैद्यकीय सुविधांवर अवलंबून आहे. त्यामुळे देशात सर्वत्र आयुर्मानवाढीच्या सरासरीत फरक असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

संसर्गजन्य आजार घटले, असंसर्गजन्य विकार वाढले
गेल्या 30 वर्षांत हिंदुस्थानात संसर्गजन्य आजारांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. सुधारलेली वैद्यकीय व्यवस्था आणि जनजागृतीमुळे अशा आजारांवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. त्यामुळेच अशा आजारांनी होणारे मानवी मृत्यू नगण्य होत आहेत. शिवाय अपघात आणि दुर्घटनांबाबत वाढलेली जागृती हिंदुस्थानातील नागरिकांचे सरासरी आयुष्य वाढण्यास कारणीभूत ठरल्याचे लॅन्सेटच्या अभ्यासकांचे म्हणणे आहे. जगभरात मानवी आयुष्य वाढत असले तरी कर्परोग आणि हृदयरोगामुळे होणाऱया मृत्यूंची संख्या वाढतेय हे मात्र चिंताजनक असल्याचे मत अमेरिकन संशोधकांनी व्यक्त केले आहे. वाढते प्रदूषण, धूम्रपान आणि तंबाखू सेवनाच्या वाईट सवयी याला कारणीभूत आहेत. गेल्या 30 वर्षांत हिंदुस्थानसह जगभरात संसर्गजन्य आजार कमी झाले असले तरी असंसर्गजन्य विकार ज्यात लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब आणि हृदयरोग वाढले आहेत ही चिंतेची बाब असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.