सीमेवरचे संपूर्ण सैन्य लवकरात लवकर हटवा, अजित डोभाल यांनीही चीनला ठणकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनीदेखील शुक्रवारी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी चर्चा केली. हिंदुस्थान-चीन संबंध सुधारण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकायचे असेल तर सर्वात आधी एलएसीवरील संपूर्ण सैन्य लवकरात लवकर हटवा, अशी आग्रही भूमिका डोभाल यांनी वांग यी यांच्यापुढे मांडली.

उभय देशांच्या सुरक्षेला धोका पोहोचेल अशी कोणतीही कृती दोन्ही बाजूंनी होऊ नये यावर चर्चेदरम्यान भर देण्यात आला. पूर्व लडाखच्या ज्या ज्या भागांत अजूनही चिनी सैन्य तैनात आहे ते संपूर्ण सैन्य लवकरात लवकर माघारी बोलवा. या सीमावादावर तोडगा निघाला तरच आम्ही चीनच्या दौऱयावर येऊ, असे चोख उत्तर डोभाल यांनी चीनच्या निमंत्रणावर दिले. सीमावाद सोडवण्यासाठी वांग यी यांनी डोभाल यांना चीनमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. त्यावर डोभाल यांनी चीनला पूर्व लडाखमधील सैन्य आधी हटवा, अशी ताकीद दिली.