
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीनंतर हिंदुस्थानी संघात निर्माण झालेली पोकळी भरण्यासाठी संघव्यवस्थापनाने सलामीला के. एल. राहुल अन् साई सुदर्शनपैकी एकाला यशस्वी जैसवालच्या साथीने पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे मधल्या फळीत कर्णधार शुभमन गिल आणि करुण नायर उतरणार यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र चौथा वेगवान गोलंदाज म्हणून शार्दुल ठाकुरपेक्षा नितीश कुमार रेड्डीची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
म्हणून नितीशची निवड होणार
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत नितीश कुमार रेड्डीने जबरदस्त फलंदाजी केली होती. त्याने ऑस्ट्रेलियन खेळपट्टीवर ज्या पद्धतीने झुंजार खेळ केला होता तो आजही सर्वांच्या लक्षात आहे. त्यामुळेच त्याला संघात स्थान मिळणे निश्चित मानले जात आहे. शार्दुलनेही आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने सर्वांना भुरळ घातली असली तरी सध्या नितीश त्याच्यापेक्षा वरचढ ठरला आहे. त्यामुळे चौथ्या वेगवान गोलंदाजासाठी दोन्ही पर्याय तगडे आहेत. 22 वर्षीय नितीशने या स्थानावर आपला कब्जा केल्याचे सध्यातरी दिसतेय.
सलामीचा प्रश्न सुटणार
रोहित शर्माच्या निवृत्तीमुळे हिंदुस्थानचा सलामीचा प्रश्न बिकट वाटत होता. तो सहज आणि सोपा करण्यासाठी संघव्यवस्थापनाने संघात चार-चार सलामीवीरांची निवड केली. आता त्यापैकी कुणाची निवड करायची हा प्रश्न संघव्यवस्थापनाने तूर्तास सोडवला आहे. विराट कोहलीमुळे संघातील चौथ्या स्थानावर करुण नायरचे पहिले नाव असल्यामुळे तिसऱया क्रमांकाची जबाबदारी खुद्द शुभमन गिलच्या खांद्यावर पडणार आहे. परिणामतः इंग्लंड लायन्सविरुद्धच्या अनधिकृत कसोटीत सलामीला येऊन 116 आणि 51 धावांची संयमी खेळी करणारा के. एल. राहुल सलामीसाठी पहिली पसंती ठरला आहे. त्याचबरोबर साई सुदर्शनही सलामीवीराच्या शर्यतीत कायम आहे. ही शर्यत कोण जिंकतो आणि यशस्वी जैसवालसह कोण सलामीला उतरतो, याचा निर्णय कसोटीच्या आदल्यादिवशीच घेतला जाईल.
हिंदुस्थानचा संभाव्य अंतिम संघ
यशस्वी जैसवाल, के. एल. राहुल, शुभमन गिल (कर्णधार), करुण नायर, अभिमन्यू ईश्वरन/साई सुदर्शन, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), रवींद्र जाडेजा, नितीश कुमार रेड्डी/ शार्दुल ठाकूर, प्रसिध कृष्णा/मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमरा.