
देशात नागरिकत्व कायद्याला चांगलाच विरोध होताना दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये काही आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. या आंदोलनाचा मोठा फटका हिंदुस्थानच्या पर्यटन व्यवसायाला बसला आहे. ताजमहाल पाहणार्या पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तसेच अनेक विदेशी पर्यटकांनी आपली सहल पुढे ढकलल्या आहेत किंवा रद्दच केल्या आहेत.
अल जझीरा या वृत्त वाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. अमेरिका, इंग्लंड, रशिया, इस्रायल, सिंगापूर, कॅनडा आणि तैवानच्या सरकारने एक सूचना जारी करून त्यांच्या देशवासियांना सूचित केले आहे की हिंदुस्थानात जिथे निदर्शने होत आहेत तिथे जाणे टाळा.
देशभरात आणि जगभरातील दोन लाख पर्यटकांनी ताज महलसाठीची सहल पुढे ढकलली आहे किंवा रद्दच केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ताज महलच्या पर्यटकांमध्ये 60 टक्क्यांनी घट झाल्याची माहिती एका पोलीस अधिकार्याने दिली. अनेक पर्यटक पोलिसांना फोन करून सुरक्षेचा आढावा घेत आहेत. परंतु कुठलाही धोका नको म्हणून ते ताज महलला भेट देण्याचेच टाळत आहेत.
आग्र्यातील अनेक हॉटेल्समध्ये पर्यटकांनी ऐनवेळी बुकींग रद्द केले आहे. आधीच मंदीमुळे व्यावसियाकांचे हाल झाले आहेत. त्यात पर्यटक घटल्यामुळे त्यांची अवस्था बिकट झाली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून सरकराने आग्र्यातील इंटरनेट सेवा बंद केली होती. त्यामुळे 50 ते 60 टक्के नुकसान झाल्याचा दावा पर्यटन व्यावसायिकांनी केला आहे.

























































