रेल्वेचा नवा नियम लवकरच; तत्काळ तिकीट बुकिंगसाठी ‘ओटीपी’ आवश्यक

नव्या नियमामुळे या गैरवापराला आळा बसणार आहे. रेल्वे ही नवीन प्रणाली आता इतर सर्व गाडय़ांमध्येही लागू करत आहे. रेल्वे तिकिटांची प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि सोयीस्कर बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

रेल्वेने तत्काळ तिकीट बुकिंग प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे. ऑनलाईन तत्काळ तिकिटांच्या नियमांमध्ये बदल केल्यानंतर आता आरक्षण खिडकीवरून तत्काळ तिकीट बुक करण्याच्या नियमांमध्येही महत्त्वाचा बदल करण्यात येणार आहे. रेल्वेच्या नव्या नियमानुसार, आता ओटीपीशिवाय तत्काळ तिकिटाचे बुकिंग करता येणार नाही. म्हणजे प्रवाशाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वन टाईम पासवर्ड म्हणजेच ओटीपी पाठवला जाईल. प्रवाशाने योग्य ओटीपी काऊंटरवरील कर्मचाऱयाला सांगितल्यानंतरच त्याचे तिकीट निश्चित केले जाईल. येत्या काही दिवसांत हा नवीन नियम लागू होण्याची शक्यता आहे.

तत्काळ तिकिटांची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांचा मोठय़ा प्रमाणात गैरवापर होतो. खरोखर गरजू असलेल्या प्रवाशांना तिकीट मिळत नाही. यापूर्वी जुलै 2025 मध्ये रेल्वेने प्रथम ऑनलाईन तत्काळ तिकिटांसाठी आधार-आधारित पडताळणी सुरू केली. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात ऑनलाईन जनरल तिकिटांसाठी पहिल्या दिवसाच्या बुकिंगसाठी ओटीपी प्रणाली लागू करण्यात आली. या दोन्ही प्रणाली प्रवाशांनी स्वीकारल्या असून यामुळे बुकिंगमध्ये पारदर्शकता वाढली आहे.