इंडिगोच्या सीईओंकडून दिलगिरी, 15 डिसेंबरपर्यंत विमानसेवा पूर्ववत करण्याचे आश्वासन

हिंदुस्थातील कमी किमतीच्या वाहक, इंडिगोमधील ऑपरेशनल संकट सुरूच आहे. वैमानिकांसाठी नवीन फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) नियम लागू करण्यात आल्याने, इंडिगोला अनेक मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, आज १,००० हून अधिक इंडिगो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यावर आता कंपनीच्या सीईओंनी या प्रकरणावर भाष्य केले आहे.

इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संदेशात सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून एअरलाइनला ऑपरेशनल अडचणी येत आहेत. ५ डिसेंबर रोजी कंपनीच्या ऑपरेशन्सवर सर्वात जास्त परिणाम झाला आहे. ते म्हणाले, “मी तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या काही दिवसांपासून आम्हाला गंभीर ऑपरेशनल अडचणी येत आहेत. यामुळे संकट आणखी गडद होत चालले आहे. आज ५ डिसेंबर हा आतापर्यंतचा सर्वात जास्त प्रभावित दिवस आहे. आम्ही १ हजारांहून अधिक फ्लाइट्स रद्द केल्या आहेत.”

ते म्हणाले, रद्द झालेल्या विमानांसाठी कृपया विमानतळावर येऊ नका. आज सर्वाधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत कारण इंडिगोची संपूर्ण यंत्रणा रीबूट केली जात आहे. १० ते १५ डिसेंबर दरम्यान इंडिगोचे कामकाज पूर्णपणे सामान्य होईल. गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या फ्लाइट वेळापत्रकाचे निरीक्षण करावे आणि नवीनतम अपडेट्स मिळवाव्यात.

सीईओंनी यावर भर दिला की गेल्या काही दिवसांपासून इंडिगोला मोठ्या प्रमाणात ऑपरेशनल आव्हानांचा सामना करावा लागला आहे, परंतु कंपनी सामान्य परिस्थिती पुनर्संचयित करण्यासाठी सर्व शक्य पावले उचलत आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि म्हटले की, “इंडिगोच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने, फ्लाइट विलंब किंवा रद्द झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेल्या सर्व प्रवाशांची मी मनापासून माफी मागतो.”