मधमाशांमुळे इंडिगोचे विमान तासभर लटकले, विमानतळ कर्मचाऱ्यांनी पळ काढला; प्रवाशांची धाकधूक वाढली

इंडिगोचे विमान क्रमांक ए320 सोमवारी दुपारी 4.20 वाजता सुरतहून जयपूरला जाणार होते. सर्व प्रवासी विमानात चढले होते. त्यांचे सामान भरले जात असताना हजारो मधमाशा विमानाच्या सामानाच्या गेटवर येऊन बसल्या. मधमाशांपासून स्वतःला वाचवण्यासाठी विमानतळ कर्मचारी पळून गेले. सर्वांना वाटले होते की मधमाशा स्वतःहून उडून जातील, पण तसे झाले नाही. यानंतर, त्यांना हाकलण्यासाठी धुराचा वापर करण्यात आला. त्याचाही काही उपयोग झाला नाही.

अग्निशमन दलालाही सूचना देण्यात आली. यानंतर, पाण्याच्या जोरदार प्रवाहाचा वापर करून मधमाशा हटवण्यात आल्या. यामुळे विमान सुमारे एक तास विमानतळावर अडकून पडले. परिस्थिती सामान्य झाल्यावर विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आली. जयपूरला विमान तासाभराच्या विलंबाने पोचले.

मधमाशांनी हल्ला केला तेव्हा प्रवासी विमानात बसले होते आणि त्यांचे लगेज ठेवले गेले होते. परंतु मधमाशांचा थवा उघड्या दरवाजावर जाऊन बसला. त्यानंतर त्यास हटविण्याचा प्रयत्न सुरू झाला. मधमाशाचा डंख खूपच तीव्र वेदना देणारा असून त्याने सूजही येते. हा दंश एक ते दोन दिवसांनी बरा होतो. काही लोकांना मधमाशांनी गंभीर अलर्जी होऊ शकते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.