
बाळ तोरसकर,[email protected]
आपल्या मातीशी जोडणारे आपले रांगडे, आरोग्यदायी खेळ जर एक छान, निरोगी आयुष्य जगायचे असेल तर खेळांशी नाते कायमच राखायला हवे…
जवळजवळ गेली वर्षभर आपण मातीतील खेळ या विषयावर समजून घेतोय किंवा ते खेळ कसे खेळले जातात, याविषयी माहिती करून घेताना ते आपल्या दैनंदिन जीवनात कसे उपयोगी पडतात, हे पाहत होतो. फक्त मातीतीलच नव्हे तर काही ‘इनडोअर’ खेळांबद्दलसुद्धा माहिती करून घेतली. ‘मातीतील खेळ’ हे सदर सुरू करण्यामागचा उद्देशच मुलांनी प्रत्येकाने मैदानात उतरावे व तंदुरुस्त राहावे हा आहे.
मी जवळजवळ 1996 पासून खो-खो खेळाची प्रसिद्धी करण्याचे काम करत आहे. विविध खो-खो स्पर्धा, खेळाडू, सामन्यांचे वार्तांकन हे नेहमीच चालू असते. त्याच बरोबर काही वेळा लंगडी, इनडोअर क्रिकेट यांवरसुद्धा लिहिले आहे.
मुलांनी सतत खेळले पाहिजे, शरीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त राहिले पाहिजे. त्याचबरोबर कोणताही खेळ खेळताना त्या व्यक्तीला वयाचे बंधन नसावे. जरी आपल्याला एखादा खेळ खेळायला आपले वय आडवे येत असेल तरी त्या खेळाचा आनंद मात्र आपण का सोडवा! मग त्यातले बारकावे आपण का हेरू नयेत व आपणही वेगवेगळे खेळ खेळत का तंदुरुस्त राहू नये, या सगळ्या विषयांतून मातीतील खेळ हे सदर बहरत गेले. आजच्या संगणक युगात शारीरिक कसरत, मैदानी खेळ मात्र मागे पडत चालले आहेत. मुलांना मिळाला वेळ की, पहिला टी. व्ही, मिळाला वेळ की लगेच हातात घेतला मोबाईल हेच चित्र आजकाल सर्वच ठिकाणी पहायला मिळतय. काही वर्षांपूर्वी मुले मैदानात दिसत. आता मात्र स्वतःच्याच खोलीत किंवा मित्राबरोबर दिसतात ते मात्र मोबाईलवरच. हे चित्र आपण सरसकट तर बदलू शकत नसलो तरी काही टक्के मुले-मुली मोबाईल सोडून जरी मैदानात उतरली तर मात्र आमचा हा वर्षभर राबवलेला हेतू सार्थकी लागला असेच म्हणावे लागेल.
या निमित्ताने मलाही विविध खेळांविषयी बरीच माहिती करून घेता आली व मीही माझ्यातील लहानपण यानिमित्ताने अनुभवले. विविध क्रीडा कार्यकत्यांबरोबर चर्चा करताना आनंद मिळाला. खरच आपल्या देशात खेळांचा खजिना भरला आहे. मर्दानी खेळात कुस्ती, कबड्डी, खो-खो, मल्लखांब, लंगडी, आटय़ापाटय़ा यासारखे खेळ नेहमीच भुरळ घालत असतात. कोणत्याही खेळाच्या सुरुवातीला केली जाणारी शारीरिक कसरत ही कुणालाही व कोणत्याही वयातील व्यक्तीला सहज उपयोगी पडू शकते. त्या-त्या खेळात तुम्ही पारंगत होऊ शकाल किंवा नाही ते त्या-त्या खेळात केलेल्या तुमच्या प्रगतीवरच अवलंबून राहील. मात्र तो खेळ खेळताना आपण केलेली शारीरिक कसरत ही आपल्याला कायमस्वरूपी उपयोगी पडते. छोटे-छोटे रनअप असो, उठक-बैठक असो वा वॉर्मअपचे इतर प्रकार असो ते कोणत्याही वयात उपयोगी पडतात व त्यामुळेच आपण कोणत्याही वयात फिट राहू शकतो. अशा प्रकारे मिळणारा शारीरिक व्यायाम आपणास व आपल्या मुलांना नेहमीच तंदुरुस्त ठेवेल. आपण वर्षभर पाहिलेल्या प्रत्येक खेळातील बारकावे व त्यांचा आपल्या शरीराला होणारे फायदे, खेळांची निरीक्षणे यांचा आपणास नेहमीच फायदा होईल. त्यामुळे नेहमीच तंदुरुस्त व आनंदी रहा हीच मनोकामना बाळगून ‘मातीतील खेळ’ हे सदर येथे संपावतो आहे. असे असले तरी काही वेगळे विषय घेऊन पुन्हा आपण भविष्यात भेटूच. आपण दिलेल्या उदंड प्रेमाच्या प्रतिसादाबद्दल मी नेहमीच आपला ऋणी राहीन.






















































