सोनिया गांधींप्रमाणे मारेकऱ्यांना माफ करा! महिला वकिलाचे निर्भयाच्या मातापित्यांना आवाहन

1692

ज्येष्ठ महिला वकील इंदिरा जयसिंग यांनी निर्भयाच्या आईवडिलांना उद्देशून एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की ज्या पद्धतीने सोनिया गांधी यांनी राजीव गांधी यांची मारेकरी नलिनीला माफ केलं आणि तिला फाशी देऊ नये अशी मागणी केली होती तसंच निर्भयाच्या मातापित्यानेही करावे. जयसिंग यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘मला आशादेवी यांच्या वेदनेची पूर्णपणे जाणीव आहे. मात्र मी त्यांना आवाहन करते की त्यांनी सोनिया गांधी यांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवावे. सोनिया यांनी नलिनीला माफ केले होते आणि म्हटले होते की तिला फाशीची शिक्षा होऊ नये. आम्ही तुमच्यासोबत आहोत मात्र फाशीच्या शिक्षेविरोधात आहोत’

‘निर्भया’ सामूहिक बलात्कार आणि हत्ये प्रकरणी चार नराधम गुन्हेगारांविरुद्ध नवे डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. 1 फेब्रुवारीला पहाटे 6 वाजता तिहार तुरुंगात चार नराधमांना फासावर लटकवले जाणार आहे. यापूर्वी 22 जानेवारीला या नराधमांना फाशी देण्यात येणार होती. मात्र कायदेशीर प्रक्रियेमुळे फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी पुढे ढकलली आहे. चार नराधमांपैकी एक मुकेश सिंहने केलेला दयेचा अर्ज दिल्लीच्या नायब राज्यपालांनी शुक्रवारी फेटाळला होता. आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही दयेचा अर्ज फेटाळला. तत्पूर्वी मुकेश सिंहने दिल्ली हायकोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. याचिका प्रलंबित असल्याने 22 जानेवारीला फाशीची शिक्षा देता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले होते. ही याचिका फेटाळली. सर्व न्यायालयीन आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती तिहार तुरुंग प्रशासनाने न्यायालयाकडे दिली. त्यानंतर आज पटियाला हाऊस कोर्टाने नवीन डेथ वॉरंट काढले असून 1 फेब्रुवारीला पहाटे सहा वाजता चार नराधमांना फासावर लटकवले जाणार आहे. त्यामुळे मुकेश सिंह, विनय शर्मा, अक्षयकुमार सिंह आणि पवन गुप्ता या चार गुन्हेगारांना फाशी दिली जाणार आहे.

राजकीय लढाई बंद करा, निर्भयाच्या आईला रडू कोसळले

न्यायालयीन प्रक्रिया आणि फाशीच्या शिक्षेला होत असलेल्या विलंबावरून राजकीय पक्षांमध्ये होत असलेल्या दोषारोपांमुळे माझा भ्रमनिरास झाला आहे. कृपया हात जोडून विनंती करते, हे बंद करा. माझ्या मुलीला न्याय द्या, अशा भावना निर्भयाच्या आईने व्यक्त केल्या. भाजप आणि ‘आप’ सरकारमध्ये होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर तीव्र नाराजी व्यक्त करताना त्यांना रडू कोसळले. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014ला सत्तेवर आले. त्या वेळी त्यांनी ‘बहुत हुआ नारी पे अत्याचार, अब की बार मोदी सरकार’ अशी घोषणा दिली होती. तसेच ‘आप’ने आंदोलन केले होते, याची आठवण निर्भयाच्या आईने करून दिली.

आपली प्रतिक्रिया द्या