इंडो – मालदीव कॅरम कसोटीत हिंदुस्थानचे निर्विवाद वर्चस्व

436

कॅरम असोसिएशन ऑफ मालदिवच्यावतीने नुकत्याच युथ सेंटर, मुलि, मीनू अटोल, मालदिव येथे आयोजित केलेल्या कॅरम इंडो – मालदिव कसोटी सामन्यात हिंदुस्थानी पुरुष, महिला, 18 वर्षाखालील मुले व मुलींच्या संघाने 5-0 असा मालदीवचा धुव्वा उडवत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. पहिल्या कसोटीमध्ये मुलांच्या गटात मालदीवच्या हतीम खालिलविरुद्ध हिंदुस्थानच्या जी. मुकेशने आपला एकमेव सामना गमावला. तर पुरुष गटात दुसऱ्या कसोटीत मालदीवच्या इस्माईल आझमीनने हिंदुस्थानच्या इर्शाद अहमदवर एकमेव विजयाची नोंद केली. हिंदुस्थानतर्फे पुरुषांमध्ये विश्व् विजेत्या प्रशांत मोरे, राजेश गोहिल तर महिलांमध्ये विश्व् विजेत्या रश्मी कुमारी, एस. अपूर्वा व आयेशा महम्मदने आपली सर्वोत्तम खेळी केली. मुलांमध्ये कामरान तन्वीर व मुलींमध्ये आकांक्षा कदम, सोनाली कुमारी, शायनी सेबेस्टनने आपली विशेष चुणुक दाखविली.

नव्याने सुरु केलेल्या अध्यक्षीय कॅरम लीगमध्ये हिंदुस्थान , मालदीव शिवाय प्रत्येक गटात श्रीलंकेच्या एका खेळाडूला खेळण्यासाठी आमंत्रित केले होते. यामध्ये मुलींच्या गटात आंतर राष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच खेळणाऱ्या हिंदुस्थानच्या 13 वर्षीय आकांक्षा कदमने कमालच केली. तिने आपल्या एकंदर 11 साखळीतील सामन्यांपैकी 10 सामने जिंकून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. हिंदुस्थानच्याच निधी गुप्ताविरुद्ध तिने एकमेव सामना गमावला होता. तर आकांक्षा कदमने साखळी सामन्यात शायनीचा पराभव केल्यामुळे साखळीतील 10 सामने जिंकूनही हिंदुस्थानच्या शायनी सेबेस्टनला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले, तर 12 वर्षीय सोनाली कुमारीने 9 सामने जिंकून रौप्य पदक पटकाविले.

मुलांमध्ये श्रीलंकेच्या सुरज मधुवंथाने आपले साखळीतील सर्वांच्या सर्व 11 सामने जिंकून या गटात आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले व सुवर्ण पदकाची कमाई केली. दुसऱ्या क्रमांकावर भारताचा जी. मुकेश व तिसऱ्या क्रमांकावर भारताचाच कामरान तन्वीर आला.

पुरुषांच्या अध्यक्षीय कॅरम लीगमध्ये प्रथमच हिंदुस्थानतर्फे खेळणाऱ्या राजेश गोहिलने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. हिंदुस्थानच्या इर्शाद अहमदविरुद्ध पराभूत झालेल्या राजेशने प्रशांत मोरे व निशांता फर्नांडो या आजी- माजी विश्व् विजेत्यांवर आपल्या साखळीतील सामन्यात विजय मिळवून सर्वाधिक 10 सामन्यात विजय मिळवला आणि आपले पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक पटकावले . तर दुसरीकडे हिंदुस्थानच्या प्रशांत मोरेनेही श्रीलंकेच्या निशांता फेर्नांडोला सहज पराभूत करून 10 सामने जिंकले होते. मात्र राजेश गोहिल विरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. 9 सामने जिंकलेल्या श्रीलंकेच्या निशांता फेर्नांडोने कांस्य पदक मिळविले.

महिलांमध्ये हिंदुस्थानच्या विश्व् विजेत्या एस. अपूर्वाने आपले साखळीतील 11 पैकी 10 सामने जिंकून सुवर्ण पदकावर नाव कोरले. तर हिंदुस्थानची माजी विश्व् विजेती रश्मी कुमारीने आपल्याच देशाच्या एस. अपूर्वा व ऐशा खोकावला विरुद्ध 2 सामने गमावले. तिला 9 सामने जिंकल्यामुळे रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तर हिंदुस्थानच्या नागज्योथीने 9 सामने जिंकत कांस्य पदकाची कमाई केली.

हिंदुस्थानी संदीप दिवे, नागज्योथी, सोनाली कुमारी व कामरान तन्वीर यांना सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले. 20 जणांच्या भारतीय चमूत प्रशांत मोरे, झहीर पाशा, रश्मी कुमारी, एस. अपूर्वा, ऐशा खोकावला वगळता सर्वच्या सर्व खेळाडू नवोदित होते. असे असतानाही हिंदुस्थानी संघाने मुलांच्या अध्यक्षीय कॅरम लीग वगळता सर्व गटात सुवर्ण पदके मिळविली. हिंदुस्थानने मालदीवचा कसोटी सामन्यात सर्व गटांमध्ये 5-0 असा पराभव केलाच शिवाय एकंदर 12 पदकांपैकी 3 सुवर्ण, 4 रौप्य व 3 रौप्य पदके पटकावून या स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. हिंदुस्थानी संघाचे मार्गदर्शक अरुण केदार, महिला व मुलींचे संघ व्यवस्थापक काशीराम तसेच पुरुष व मुलांचे संघ व्यवस्थापक जी. इरुदयाराज यांनी भारतीय संघाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करत विजयी खेळाडूंचे विशेष अभिनंदन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या