
इंडोनेशियामध्ये शवपेटय़ा बनवण्याचा व्यवसाय करणारा जोसुआ हुतागलुंग हा 33 वर्षांचा व्यक्ती आकाशातून पडलेल्या एका दगडामुळे 10 कोटींचा मालक झाला आहे. हा दगड म्हणजे उल्कापिंड असून साडेचार अरब वर्षे जुना दुर्मिळ उल्केचा भाग आहे.
उत्तर सुमात्रामधील कोलांग येथील घरात जोसुआ राहतो. घरात काम करत असताना त्याला अचानक मोठा आवाज ऐकू आला. आपल्या खोलीचा दरवाजा उघडून जोसुआ हॉलमध्ये आला तेव्हा घराच्या छप्पराला मोठं भगदाड पडल्याचे दिसले. आणि जमिनीवर एक मोठय़ा आकाराचा दगड दिसून आला. हा उल्कापिंड जमिनीतून काढला तेव्हा तो खूपच गरम होता.
उल्कापिंडाचे वजन जवळजवळ दोन किलोहून थोडे अधिक आहे. त्याच्यामुळे जोसुआच्या घरातील फरशीवर 15 सेंटीमीटरचा खड्डा पडला. घराला नुकसान झाले असले तरी जोसुआसाठी हा उल्कापिंड फायद्याचा ठरला. या उल्कापिंडासाठी जोसुआला 14 लाख पाऊंड म्हणजेच 10 कोटी रुपये मिळालेत.
हा उल्कापिंड अत्यंत दुर्मिळ प्रकारातील असल्याचे सांगण्यात येत आहे. या उल्कापिंडाची किंमत प्रतिग्राम 857 डॉलर म्हणजेच 63 हजारांहून अधिक आहे. अनेक वर्षे काम करून जोसुआला जेवढा पगार मिळाला नसता तेवढं धन त्याला हा उल्कापिंड विपून मिळाले आहे. या पैशांतील काही भाग हा आपल्या समाजातील लोकांसाठी चर्च उभारण्यासाठी वापरणार असल्याचे जोसुआने सांगितले.




























































