भाजपच्या स्मार्ट सिटी मॉडेलमध्ये पाणी आणि हवाही विषारी; इंदूरमधील पाणी दुर्घटनेवरून राहुल गांधी संतापले

मध्य प्रदेशातील इंदूर शहरात असलेल्या भागीरथपुरा भागात दूषित पाणी प्यायल्याने मृत्यू झालेल्यांची संख्या 15 वर पोहोचली असून 338 नवीन रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे. या भीषण घटनेमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे. देशाला स्मार्ट सिटी बनवण्याचे आश्वासन हवेत विरल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला धारेवर धरले आहे.

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपच्या विकास मॉडेलवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजपचे नवे स्मार्ट सिटी मॉडेल म्हणजे  दुषित पाणी, विषारी हवा, जमिनीवर विष आणि विषारी औषधे असे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या सर्व प्रकाराबाबत जर कोणी जाब विचारला, तर त्यांच्या घरावर बुलडोजर चालवला जातो, असा टोलाही त्यांनी लगावला.

अशा प्रकारच्या मॉडेलमध्ये गरिबांच्या मृत्यूला कोणीही जबाबदार धरले जात नाही, ही खेदाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. इंदूरमधील या घटनेला सरकारचा निष्काळजीपणा जबाबदार असून त्यांनी या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारण्याची मागणी केली आहे. दोषींवर कडक कारवाई करावी आणि पीडितांना लवकरात लवकर उपचार व योग्य नुकसान भरपाई द्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, जिथे लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नाही, तिथे लोकांना घाबरवणे हेच स्मार्ट सिटीचे नवीन मॉडेल बनले आहे.

इंदूरमधील अस्वच्छ पाणी आणि त्यामुळे होणारे मृत्यू हे सरकारच्या नागरी विकास मॉडेलचे अपयश आहे. ही परिस्थिती केवळ इंदूरपुरती मर्यादित नसून अन्य शहरांमध्येही अशा घटना घडू शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. नागरिकांना स्वच्छ हवा आणि शुद्ध पाणी पुरवणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे, मात्र सरकार या मूलभूत कामातच अपयशी ठरल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.