इंदूर दूषित पाणीप्रकरण – सरकारने या पापाचे प्रायश्चित्त घ्यायला हवे, उमा भारती यांचा भाजपला घरचा आहेर

इंदूरमध्ये दूषित पाणी प्यायल्याने अनेकांवर मृत्यू ओढावल्याने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. यावर आता मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी आपल्याच सरकारवर जोरदार टीका करत संताप व्यक्त केला आहे. ही घटना लज्जास्पद असून यासाठी सरकारने माफी मागायला हवी. मृतांच्या कुटुंबियांसाठी 2 लाख रुपये नुकसान भरपाई ही त्यांच्या आयुष्याची किंमत असू शकत नाही, असेही उमा भारती म्हणाल्या.

उमा भारती मध्य प्रदेशमध्ये आपल्याच पक्षाच्या सरकारला घेरले आहे. इंदूरमध्ये दूषित पाण्याने अनेक लोकांचे मृत्यू झाले असून ही घटना सरकार आणि प्रदेशासाठी लज्जास्पद आहे. त्यांनी शुक्रवारी एक्सवर लिहीले की, इंदूरमध्ये दूषित पाणी प्यायल्याने मृत्यू होणे म्हणजे आपला प्रदेश, आमचे सरकार आणि आपली संपूर्ण व्यवस्थेसाठी लज्जास्पद घटना आहे. त्यांनी पुढे लिहीले की, मध्य प्रदेशातील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार प्राप्त झालेल्या इंदूर शहरात एवढी अस्वच्छता आणि दूषित पाणी अनेकांचे जीव घेत आहे. मृतांचे आकडे वाढत आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेली नुकसान भरपाई तुटपुंजी असून त्यांनी पीडितांची माफी मागावी, असे त्या म्हणाल्या.

उमा भारती पुढे म्हणाल्या, मृतांच्या आयुष्याची किंमत दोन लाख रुपये कशी काय असू शकते? त्यांच्या कुटुंबियांसाठी ते आयुष्यभराचे दु:ख आहे. या पापाचे प्रायश्चित घ्यायला हवे. पीडितांची माफी मागायला हवी. जे यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी. हा मोहन यादव यांच्यासाठी परीक्षेचा काळ आहे, असेही त्या म्हणाल्या. शिवाय त्यांनी हे ट्विट भाजपचे अधिकृत हॅंडल आणि मोहन यादव यांना टॅग केले आहे.