अलंकापुरीत इंद्रायणी नदी प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली; इंद्रायणी पुन्हा फेसाळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंद्रायणीत पिंपरी चिंचवड हद्दीतून थेट इंद्रायणी नदी केमिकल रसायन मिश्रित सांडपाणी सोडत असून याच पाण्यात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाच्या पाण्यात केमिकल युक्त पाणी सोडण्यात आल्याने पांढऱ्या फेसाने इंद्रायणी नदी फेसाळली. नदीला हिम नदीचे रूप आल्याने भाविक, नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. आळंदीत पांढऱ्या फेसाचे ढीग नदीचे पाण्यावर तरंगत होते.

इंद्रायणी नदीवर पांढरे फेसयुक्त ढीगच ढीग पसरल्याने हिम नदीचे इंद्रायणी नदीला रूप आल्याचे भाविकांनी पाहत प्रदूषण नियंत्रण मंडळ, आळंदी नगरपरिषद, पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाचे कामकाजावर नाराजी टप व्यक्त करीत ताशेरे ओढले. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील औद्योगिक क्षेत्र तसेच इंद्रायणी नदी लगतचे उद्योग व्यवसाय येथील सांडपाणी, मैला मिश्रीत आणि रसायन मिश्रित पाणी थेट कोणत्या हि प्रकारची पाण्यावर प्रक्रिया न करता सोडले जात असल्याने आळंदीत मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. येत्या महिन्यात आळंदीत कार्तिकी यात्रा होत असून कार्तिकी यात्रेपूर्वी नदी प्रदूषण रोखण्यास उपाय योजना करण्याची मागणी नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी केली आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तात्काळ नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याचे आदेश देऊन सर्व संबधित घटकांनी तातडीची बैठक घेण्याची मागणी आळंदी जनहित फाउंडेशनचे वतीने अद्यक्ष राजेश घुंडरे यांनी केली आहे.

येथील आळंदीजनहित फाउंडेशन, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान सह वारकरी , भाविक यांनी नदी प्रदूषण रोखण्याची मागणी केली आहे. यासाठी राज्य शासन, जिल्हा प्रशासन यांना निवेदने देऊन नदी प्रदूषण रोखण्यास साकडे घातले आहे. मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्षाने इंद्रायणी नदी प्रदूषणात वाढ झाल्याने नागरिकांनी प्रशासनाचे कामकाजावर टीका केली आहे. नदी प्रदूषण करणारे घटक कंपन्यां यांचेवर कडक कारवाई करण्याची मागणी वारकरी संप्रदायातून जोर धरत आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी भगवान महाराज कोकरे हे गेल्या 11 दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

या प्रदुषणामुळे नदीकाठावरील राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून सध्या डासांची संख्या या प्रदूषित पाण्याने कमी झाल्याचे यशोधन महाराज साखरे यांनी सांगितले. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा, आषाढी आणि कार्तिकी यात्रा दर महा एकादशी, गुरुवार, रविवार दिनी आळंदीत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येत असतात. स्थान माहात्म्य जोपासत नदीचे पाणी वारकरी प्राशन करतात. यामुळे नदी प्रदूषण रोखण्याची गरज आळंदी पंचक्रोशी सर्कलचे अरुण कुरे व्यक्त केली आहे.