इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा, तृप्ती देसाई नगरला जाऊन पोलिसांकडे मागणी करणार

684
trupti-desai-bhumata-brigade

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई मंगळवारी नगरमध्ये जाणार आहेत. तिथल्या पोलीस अधीक्षकांची त्या भेट घेणार आहेत. कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केलेल्या एका विधानाच्या विरोधात देसाई या तक्रार देणार आहेत. हा महिलांच्या सन्मानाचा प्रश्न असल्याचं म्हणत देसाई यांनी इंदुरीकर महाराजांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. एकीकडे देसाई या नगर जिल्हा पोलिसांना हे निवेदन देणार आहेत तर दुसरीकडे इंदुरीकर महाराज यांच्या समर्थकांनी ‘चलो नगर’चा नारा दिल्याचे कळतं आहे.

trupti-on-inurikar-maharaj

इंदुरीकर महाराजांनी शांततेचं आवाहन करणारं पत्रक हे लोकांना दाखवण्यासाठी काढल्याचा आरोप देसाई यांनी केला आहे.नगर जिल्ह्यात आल्यास अॅसिड हल्ला होईल, अंगावर झडप टाकतील, अडवतील अशी भीती काहींनी वर्तवली होती असं देसाई यांनी म्हटले. हे करण्यासाठी इंदुरीकर महाराजांनीच आतून माणसे तयार केल्याचा आरोप देसाई यांनी केला आहे. आपल्यावर होणारी अश्लील टीका ही देखील इंदुरीकर महाराजांच्या सांगण्यावरून होत असल्याचा आणखी एक आरोप त्यांनी केला आहे. आपण नगरच्या अधीक्षकांना भेटण्याच्या भूमिकेवर ठाम असून 5 जणांचे शिष्टमंडळ मंगळवारी अधीक्षकांची भेट घेणार असल्याचं देसाई यांनी म्हटले आहे.

बीडमध्ये इंदुरीकर महाराजांचं कीर्तन झालं होतं, कीर्तनापूर्वी त्यांचं जंगी स्वागत झालं आणि कीर्तनात ‘आय सपोर्ट इंदुरीकर’ असे बोर्डही झळकले. मुलगा-मुलगीच्या जन्माबाबत वक्तव्य केल्यामुळे वादात अडकलेले लोकप्रिय कीर्तनकार निवृत्तीमहाराज इंदुरीकर यांच्या समर्थनार्थ अनेक जण पुढे येत आहे, तर दुसरीकडे त्यांना होणारा विरोधही वाढत चालला आहे.  इंदुरीकर महाराजांसाठी आंदोलनं करण्याची समर्थकांनी तयारी सुरू केली होती. मात्र, खुद्द इंदुरीकर महाराजांनी चाहत्यांना त्यापासून रोखलं होतं. आपल्यासाठी कुणीही मोर्चे, आंदोलनं करू नये, असं आवाहन त्यांनी पत्रकाद्वारे केलं होतं.

इंदुरीकर महाराजांनी एक पत्रक जाहीर केलं आहे. त्या पत्रकानुसार, ‘आपण कोणीही, कुठेही मोर्चा, रॅली, एकत्र जमणे, निवेदन देण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन त्यांनी समर्थकांना केलं आहे. ‘चलो नगर’ म्हणून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहे. आपण सगळी माझ्यावर प्रेम करणारी भक्त मंडळी आहात. वारकरी संप्रदाय शांतताप्रिय आहे. त्यामुळं आपण कोणीही, कुठेही मोर्चा, रॅली, एकत्र जमणे, निवेदन देणे असे काहीही करण्याचा प्रयत्न करू नये. अशामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आपण आपली बाजू कायदेशीररित्या शांततेच्या मार्गाने मांडणार आहोत. तरी सर्वानी शांतता राखून सहकार्य करावं,’ अशी विनंती त्यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला केल्यास मुलगी होते’ असे वक्तव्य केल्याबद्दल प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर हे वादाच्या भोवऱयात सापडले आहेत. हे वक्तव्य म्हणजे गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात आहे असा आरोप करत राज्याच्या पीसीपीएनडीटीच्या सल्लागार समितीने इंदुरीकर महाराजांना नोटीस बजावली आहे.

प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान (पीसीपीएनडीटी) प्रतिबंधक सल्लागार समितीने इंदुरीकर महाराजांकडून या वक्तव्याबद्दल खुलासा मागितला आहे. इंदुरीकर यांनी ओझर येथील कीर्तनामध्ये हे वक्तव्य केले होते. ते वक्तव्य म्हणजे पीसीपीएनडीटी प्रतिबंधक कायद्याच्या कलम 22 चे उल्लंघन आहे असे समितीने म्हटले आहे. पुरावे आढळले तर इंदुरीकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल, असेही समितीने म्हटले आहे.

इंदुरीकर महाराज हे आपल्या कीर्तनातून सामाजिक, राजकीय क्षेत्रांमधील विषयांना हात घालत असतात. जनसामान्यांना समजेल अशा सहजसुलभ भाषेतील त्यांची कीर्तने सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण ओझरच्या कीर्तनातील त्यांचे वक्तव्य वादग्रस्त ठरल्याने ते अडचणीत सापडले आहेत. यापूर्वी संभाजी भिडे गुरुजी यांनी एका ठरावीक ठिकाणच्या बागेतील आंबे खाल्ल्यास मुले होतात असा दावा करून वाद ओढवून घेतला होता.

आपली प्रतिक्रिया द्या